11 August 2020

News Flash

दोन भिन्न जीवनशैलीतील वाद!

अलिबाग पट्टय़ात मुंबईची ‘संस्कृती’ रुजविण्याचा प्रयत्न

अभिनेता शाहरूख खान यांनी वाट अडविल्याने संतप्त झालेले शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शाहरूखला खडसविल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर झळकल्यावर त्याची वेगवेगळी प्रतिक्रिया उमटली असली तरी मुंबईतील बडय़ा हस्तींनी अलिबाग पट्टय़ात मुंबईची ‘संस्कृती’ रुजविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने दोन भिन्न जीवनशैलीतील वादाला सुरुवात झाली आहे. गेटवे ऑफ इंडियावर घडलेला प्रकार ही सुरुवात असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया ऐकू येते.

वरवर पाहिले तर शाहरूख खान आणि आमदार पाटील यांच्यातील वाद सुरक्षारक्षकांच्या अतिरेकामुळे निर्माण झाला. यातून आमदार पाटील दुखावले गेले आणि त्यांनी शाहरूखला माझ्या परवानगीशिवाय अलिबागला कोणी पाऊल ठेवू शकत नाही, अशी धमकी देऊन टाकली. यावर स्पष्टीकरण देताना पाटील यांनी शाहरूखमुळे सामान्य प्रवाशांना वेठीस धरण्यात आले असे सांगितले. वास्तविक पाहता खासगी स्पीड बोटीसाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे स्वतंत्र जेटी आहे. या ठिकाणाहून प्रवासी जलवाहतूक होत नाही. पण याच वेळी आमदार पाटील हे आणखी एक आक्षेप घेतात. मुंबईतून हायप्रोफाइल लोक अलिबागला येतात ते रात्रभर पाटर्य़ा करतात आणि सामान्य जनतेला याचा त्रास होतो. दोन भिन्न जीवनशैलीतील राहणीमान हे यामागचे मूळ कारण आहे.

गेल्या काही वर्षांत अलिबाग ते मांडवा हा परिसर वीकेण्ड डेस्टिनेशन म्हणून नावारूपास आला आहे. देशभरातील गर्भश्रीमंतांनी या परिसरात मोठी गुंतवणूक केली आहे. बडे उद्योजक, बॉलीवूड अभिनेते, क्रिकेटपटू, लेखक, बांधकाम व्यावसायिक, जाहिरात तसेच फॅशन जगतातील नामांकित आणि कलाकार समावेश आहे. अलिबाग परिसर जलमार्गाने दक्षिण मुंबईशी जोडला गेला आहे. स्पीड बोटीने अवघ्या १५ ते २० मिनिटांत येथे पोहोचणे शक्य आहे. त्यामुळेच दक्षिण मुंबईतील अनेक बडय़ा व्यक्तींनी अलिबाग परिसरात स्थानिक ग्रामपंचायतींना हाताशी धरून आपले आलिशान महल उभे केले आहेत. आणि दक्षिण मुंबईतील क्लब, पब आणि पार्टी संस्कृती अलिबागमध्ये आणली.

या क्लब आणि पब संस्कृतीने आता स्थानिकांच्या पारंपरिक संस्कृतीवर आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. हे शाहरूख आणि आमदार पाटील यांच्या वादामागचे मूळ कारण आहे. या परिसरात प्रामुख्याने आगरी, कोळी आणि माळी समाज मोठय़ा प्रमाणात राहतो. पारंपरिक शेती, मासेमारी आणि बागायती येथील लोकांचा आजवर व्यवसाय होता. अलीकडच्या काळात या पर्यटन व्यवसायाची भर पडली. त्यामुळे मुंबईच्या पर्यटकांबरोबर तेथील जीवनशैली येथे येण्यास सुरुवात झाली. या दोन जीवनशैलीत कमालीची भिन्नता आहे. रात्रभर चालणाऱ्या पाटर्य़ा, नाच गाणे, राहणीमान यांच्या कुठेच ताळमेळ मिळत नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. त्याची परिणती अशा वादात होते.

स्थानिक ग्रामस्थांकडील हळदी किंवा अन्य समारंभाकरिता ध्वनिक्षेपक निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ सुरू राहिल्यास पोलीस कारवाई करतात. पण मुंबईतील बडय़ा व्यक्तींच्या बंगल्यांमध्ये रात्रभर धुडगूस सुरू असतो. तेव्हा पोलीस यंत्रणा कुठे असते, असा प्रश्न केला जातो. नेमका यावरच आमदार पाटील यांनी बोट ठेवले आहे.

दर शनिवार आणि रविवारी या परिसरात मुंबईतून जवळपास सात ते आठ हजार लोक अलिबाग परिसरात येतात. ठिकठिकाणी आलिशान बंगल्यांच्या चार भिंतींच्या आत या पाटर्य़ा रात्रभर चालतात. याचा अनेकदा स्थानिकांना त्रास होतो. अनेकदा पर्यटक मद्यपान करून धिंगाणा घालतात. मग हा वाद विकोपाला जातो.

मुंबईच्या या क्लब आणि पब संस्कृतीने आता स्थानिक संस्कृतीवर घाला घालण्यास सुरुवात केली आहे, अशी असुरक्षिततेची भावना येथील लोकांमध्ये निर्माण होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. आपल्याकडे ‘जसा देश तसा वेश’ अशी एक म्हण प्रचलित आहे. त्यामुळे मुंबईतून येणाऱ्यांनी याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. दोन भिन्न जीवनशैलींमधील ही दरी दूर होण्यासाठी काही काळ लागणार आहे.

  • नववर्षांच्या स्वागतासाठीसाठी मुंबईतून दरवर्षी २५ ते ३० हजार पर्यटक अलिबागला येतात. त्यांच्यासाठी स्थानिक हॉटेल व्यवसायिक डीजे नाइट्स, गाला डान्स, बॉलीवूड नाइट्स, अनलिमिटेड ड्रिंक आणि फूड पाटर्य़ाचे आयोजन करतात.
  • गेल्या वर्षी अलिबागमध्ये जवळपास ७९ ठिकाणी अशा पाटर्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी तात्पुरते मद्यविक्री परवाने आणि डीजेचे वापराचे परवानेही देण्यात आले होते.
  • पूर्वी पाटर्य़ा नववर्षांसाठी आयोजित होत असत, आता मात्र दर आठवडय़ात अशा पाटर्य़ाचे आयोजन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे खासगी घरांमध्ये होणाऱ्या अशा पाटर्य़ावर कोणाचेही र्निबध राहिलेले नाहीत.

मुंबईची चंगळवादी संस्कृती आता रायगड जिल्ह्य़ात सरकायला लागली आहे. मात्र रायगडची सामाजिक व आíथक परिस्थिती या चंगळवादाला सामोर जाण्याइतकी अद्याप सक्षम झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये याबाबत असुरक्षितता निर्माण होणे, स्थानिक संस्कृतीवर चंगळवादाचे आक्रमण होत असल्याचे वाटणे स्वाभाविक आहे. आíथकदृष्टय़ा सक्षम घटक ही संस्कृती आत्मसात करेल पण त्याला काही काळ जावा लागेल.  – डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष, रिसोर्स सेंटर फॉर ह्य़ुमन डेव्हलमेंट

शाहरूखपुरता हा मुद्दा मर्यादित नाही, त्याने अलिबागला येण्याबाबतही माझा आक्षेप असण्याचे कारण नाही, तो मोठा अभिनेता आहे. पण यासाठी त्याने जनतेला वेठीस धरणे गर आहे. हे लोक अलिबागला येतात, डीजे लावून रात्रभर पाटर्य़ा करतात. पोलीस त्यांना रोखत नाही. सामान्य माणसाने लग्न-समारंभात हळदीसाठी ध्वनिक्षेपक लावले तर मात्र कारवाई होते. माझा याला आक्षेप आहे. याविरोधात मी आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवणार आहे.    – जयंत पाटील, आमदार, विधान परिषद 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2017 2:28 am

Web Title: jayant patil opens up about his alleged altercation with shah rukh khan
Next Stories
1 ‘पतंजली’च्या अन्नप्रक्रिया उद्योगात हेटीकुंडी केंद्राची भर
2 सोलापुरात ऊस आंदोलन पेटले; आता दरासाठी ‘रक्तदान’
3 उमरखेडमध्ये आश्रम शाळेतील ७ वर्षांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
Just Now!
X