राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेशात घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेवर जयंत पाटील यांनी दुःख व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं.

या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले,”जिथे माता गंगा, माता जमुनाची संस्कृती वास्तव्य करते. ज्या भूमीचं प्रतिनिधित्व स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी, स्व. कांशीराम आणि कित्येक महान नेत्यांनी केलं. त्या भूमितून जेव्हा अशा बातम्या येतात, तेव्हा खूप दुःख होतं. मला आशा आहे की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याची गंभीर दखल घेतील आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देतील,” अशी मागणी जयंत पाटील यांनी ट्विट करून केली आहे.

आणखी वाचा- उत्तर प्रदेश : हाथरस येथील गँगरेप पीडित दलित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

नराधमांचं क्रूर कृत्य

१४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. या ठिकाणी सवर्ण समाजातील चार तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली, तेव्हा तिची जीभ कापलेली होती. तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झालेली होती.