काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यावर महाराष्ट्राच चित्र कसं असेल, हे या निवडणुकीत दिसून आले आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या यशानंतर बोलताना व्यक्त केलं आहे. पदवीधर निवडणुकांचा आज निकाल लागला यामध्ये भाजपाला मोठा बसल्याचे चित्र दिसत आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधाना जयंत पाटील यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच भाजपाचाही समाचार घेतला.

पदवीधर मतदारसंघातील निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पत्रकांशी संवाद साधताना पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एक एकटं लढावं असं आवाहन केल्याचा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी, “चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोलणे आवश्यक नाही. त्यांच्या चॅलेंबद्दल नंतर बघू,” असं उत्तर देत प्रश्न उडवून लावला.

याच प्रश्नाचा संदर्भात घेत जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. “भाजपाच्या काही नेत्यांना स्वप्नं पडतात की ऑपरेशन लोटस करु, महाविकास आघाडीच्या आमदारांना अमिषं दाखवून राजीनामा द्यायला लावायचे आणि सरकारला धोका निर्माण करायचा, असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जरी राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवायची ठरवले, तरी महाविकास आघाडी त्यांना पराभूत करेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- “म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…”; गावरान शैलीत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

धुळे- नंदुरबारमधे भाजपाने आमचेच उमेदवार फोडून निवडणूक लढवली. अमरीश पटेल यांच्याव्यतिरिक्त इतर उमेदवार असता. तर वेगळा निकाल लागला असता, असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. लोकशाहीत तत्वाला जसं महत्त्व आहे. तसंच संख्येला देखील महत्व आहे. त्यामुळे जे पक्षात परत येण्यास इच्छुक आहेत. त्यांना दरवाजे मोकळे आहेत. पण पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- वाचाळ बडबड करणार्‍यांना हा निकाल म्हणजे जबरदस्त चपराक; अजित पवारांचा भाजपाला टोला

अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना, चंद्रकांत पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेकांवर अन्याय केला. त्याची यादीच मी चंद्रकांत पाटील यांना देऊ शकतो, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.