जबड्यातील दात मोजणारे भाजपाचे नेते हे शिवसेनेवर कुरघोड्या करून धोबीपछाड करणार म्हणतात पण युतीची चर्चा मात्र पडद्याआड करत असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी कर्जतच्या सभेत केली. विकासाचा आणि शिवसेनाच संबंध कधीच नव्हताच मात्र शिवसेनेने आपला स्वाभिमान नेहमीच टिकवून ठेवला होता. मात्र भाजपसोबत राहताना शिवसेनेच्या नेत्यांनी आपला स्वाभिमान गहाण टाकून दिल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ह्या सरकारने केली नसल्यामुळेच आम्हाला परिवर्तन यात्रेची सुरुवात करावी लागली आहे. परिवर्तन हे नक्कीच होणार आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क यात्रेच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधत असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जे शक्य आहे ते द्यायचे, मनाला वाटेल ते आश्वासन देण्याचे काम नरेंद्र आणि देवेंद्र करीत आहेत. पाच राज्यातील पराभवामुळे भाजपा सरकार आश्वासनांचा पाऊस पाडत असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. गोवा रस्त्याचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी दोन वेळा केले पण रस्ता आजही पूर्ण होत नाही. फक्त नारळ फोडण्याचे काम करत असल्याची टीका जयंतराव पाटील यांनी केली.

सभेत नवाब मलिक, चित्रा वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार सुरेश लाड, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.