पावसाअभावी दरवर्षी टंचाईच्या सावटाखाली राहिलेल्या चाळीसगाव तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले. तब्बल ३२ गावांना पुराचा फटका बसला असून, लहान-मोठ्या ६६१ जनावरांचा मृत्यू झाला. तितूर आणि डोंगरी या नद्यांच्या पात्रात वाढलेले अतिक्रमण, सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेली बांधकामे, अवैधरीत्या होणारा वाळू उपसा, नालेसफाईकडे दुर्लक्ष आदी कारणांनी चाळीसगाव शहरातील वस्त्या, बाजारपेठा जलमय झाल्या. यानंतर अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. फुटलेल्या पाझर तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नसताना चक्क कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरुन तीन किलोमीटरचा प्रवास करत आणि चिखल तुडवत अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्यातील जळगाव, औरंगाबाद इथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत आहेत. शनिवारी सकाळी चाळीसगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

तीन दिवसापूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने बिलदरी पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटलं होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज या तलावाची पाहणी केली. यावेळी संबधित अधिकारी उपस्थित होते. पहिल्यांदा या तलावाची दुरुस्ती करू असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी जनतेला दिले आहे.

बिलदरी पाझर तलाव फुटल्याने जमिनीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ती पाणथळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. आजूबाजूचा परिसर या पाझर तलावातील पाण्यावर शेती आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी अवलंबून होता. स्थानिकांची पाण्याविना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाईल असे ठाम आश्वासनही जयंत पाटील यांनी इथल्या नागरिकांना दिले.

उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगावमधील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. गिरणा, तितूर, डोंगरी या नद्यांसह नाल्यांना पूर आल्याने चाळीसगावसह नदीकाठावरील सहापेक्षा अधिक गावांमध्ये पाणी शिरले होते. एका महिलेचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. दरड कोसळल्यामुळे बंद झालेली कन्नड घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुपारनंतर काम सुरु करण्यात आले.

चाळीसगावमध्ये अतिवृष्टीने एकाचा मृत्यू झाला. पुरामुळे ३०० दुकाने, ६१७ घरांचे अंशत: तर २० घरांचे पूर्णत: नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे.