जयंत पाटील यांची टीका; तावडे यांनी आरोप फेटाळले

राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘भगवद्गीता’ वाटप करणे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून हिंदुत्ववादी विचारसरणी पुढे करण्याचा घाट आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

भगवद्गीतेबद्दल प्रत्येकाला आदर असून हे भारतातील प्राचीन पुस्तक आहे. ज्याला हे पुस्तक वाचायचे असेल, त्याला ते स्वातंत्र्य आहे, परंतु महाविद्यालयांत त्याचे सक्तीने वाटप योग्य नाही. उच्च शिक्षण घेतलेले शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीच हे पुस्तक वाचले काय?  सध्याच्या सरकारला राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये चालवता येत नसल्याचे चित्र आहे. सर्वत्र अभ्यासक्रमातील सुधारणा, ते पूर्ण करणे, परीक्षेबाबतचा घोळ यासह इतर अनेक गोष्टींवर बोंब आहे. त्यात सरकारने सुधारणा करण्याऐवजी हा विभाग महाविद्यालयीन मुलांना भगवद्गीता वाटत फिरत आहे. सरकारने विकासाचे स्वप्न दाखवत सत्ता मिळवली, परंतु विकास करता आला नसल्यामुळे विविध धार्मिक मुद्दे पुढे काढत दोन समाजात तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

ध्रुवीकरणाचा प्रयत्न -वडेट्टीवार

या सरकारने जनतेला राम मंदिर बांधण्याचे स्वप्न दाखवत मते मिळवली, परंतु सत्तेवर आल्यावर त्यांना याचा विसर पडला. पूर्वी भाजपचे नेते पूर्ण बहुमत नसल्याचे सांगत होते. आता बहुमत मिळाल्यावरही ते आश्वासन पूर्ण करू शकत नसल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. जनता हे खपवून घेणार नाही, असे मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

..तर कुराण, बायबल वाटण्याचीही परवानगी -विनोद तावडे

भिवंडीतील भक्ती वेदांत ट्रस्टने माझ्याकडे येऊन प्रत्येक महाविद्यालयात शासनाने स्वखर्चाने भगवद्गीता वाटप करण्याची मागणी केली होती, परंतु शासन असल्या पद्धतीने खर्च करू शकत नसल्याचे स्पष्ट केले गेले. त्यानंतर ट्रस्टने स्वत: भगवद्गीता वाटण्याची तयारी दर्शवल्यावर शासनाने त्यांना महाविद्यालयांची यादी उपलब्ध करून दिली. या संस्थेकडून काही महाविद्यालयांत स्वत: पुस्तक वाटप केले गेले. वाटप शक्य न झालेल्या महाविद्यालयांना पुस्तके वाटप करण्यासाठी ट्रस्टने शिक्षण सहसंचालक कार्यालयांना विनंती केली. तेथे पुस्तक उपलब्ध केले गेले. त्यावरून या कार्यालयांनी काही महाविद्यालयांना पुस्तक नेण्यासाठी पत्र काढले. विरोधी पक्षनेत्यांकडून होणारी टीका बघता त्यांना भगवद्गीता आणि श्रीकृष्ण यांच्यावर विश्वास नाही काय? हा प्रश्न उपस्थित होतो. वास्तविक या पद्धतीची विनंती कुराण, बायबलसह इतर पुस्तक वाटपाबाबत कुणा संस्थेची आल्यास त्यालाही शासन परवानगी देईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.