जयंत पाटील यांचे विखेंच्या काँग्रेसनिष्ठेलाच आव्हान

राज्यात भाजप-शिवसेनेचा पराभव करण्यासाठी महाआघाडी उभारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अहमदनगरच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली आहे. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला, तर सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे खरे पाईक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करतील, असे सांगत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विखे यांच्या काँग्रेसनिष्ठेलाच आव्हान दिले.

राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसने नगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मागितला होता; परंतु त्याला त्या पक्षाने नकार दिला. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्वी बाळासाहेब विखे-पाटील यांचा पराभव केल्याची आठवण करून दिल्याने विखे पिता-पुत्र दुखावले गेले. नगरची जागा मिळत नाही आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून उलट अवमान होत आहे, अशी भावना झाल्याने सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आघाडीत बिघाडीला सुरुवात झाली.

विखे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाणार नाही, असा इशाराच दिला. शरद पवार यांनी आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे सांगून, हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल बोलणे कितपत शोभनीय आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे. त्यांच्या वक्तव्याने मनाला वेदना झाल्या, असे विखे म्हणाले. राधाकृष्ण विखे यांच्या या वक्तव्यावर विशेषत: नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जाणार नाही, या विधानावर राष्ट्रवादीमधूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

बैठकीत सुजय यांच्या भाजप प्रवेशाचे पडसाद

लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ  नेत्यांच्या बैठकीत सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाचे पडसाद उमटले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. काही नेत्यांनी राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. थोरात यांनी पक्षनिष्ठेचा प्रश्न  उपस्थित केल्याने त्यावरून वाद झाल्याचे सांगण्यात येते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत विखे यांनी आपली बाजू मांडली. सुजयचा निर्णय वैयक्तिक होता, त्याबाबत पक्षश्रेष्ठींना जे काही सांगायचे ते मी सांगेन, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे ते म्हणाले. राधाकृष्ण विखे यांचा राजीनामा मागितलेला नाही, मला तो अधिकार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. अहमदनगरच्या जागेवरून आघाडीत अडचण येणार नाही, असा दावाही त्यांनी केला.