राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांनी विजय मिळवला असला, तरी ६५ टक्के मतदारांनी त्यांना नाकारले, तर पक्षाच्या पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते आष्टीत सुरेश धस यांनी घेतली. बीड मतदारसंघात मागील वेळी क्षीरसागरांना ७६ हजारांचे मताधिक्य होते. या वेळी तेवढीच मते त्यांना मिळाली.
सहापकी बीड मतदारसंघात क्षीरसागर यांचा ६ हजारांच्या मताधिक्क्याने निसटता विजय झाला. क्षीरसागर घराण्याचा जिल्हय़ाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. केशरबाई क्षीरसागर यांनी सरपंच ते खासदारकीपर्यंत यश मिळवताना वर्चस्व निर्माण केले. त्यांचा वारसा जयदत्त पुढे चालवत आहेत. पाच वर्षांपूर्वी चौसाळा मतदारसंघ कमी झाल्यानंतर त्यांनी बीडमधून तब्बल ७६ हजारांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. नगरपालिकेसह सर्वच स्थानिक संस्थांवर क्षीरसागरांचे वर्चस्व आहे. खासगी शिक्षण संस्थांचे मतदारसंघात जाळे आहे. त्यामुळे हक्काचा मतदार असतानाही त्यांच्याविरुद्ध मतपेटीतून मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त झाली.
युती तुटल्याने ऐनवेळी आलेल्या भाजपच्या विनायक मेटे यांनी शेवटपर्यंत त्यांना कडवी झुंज दिली. हक्क बजावलेल्या दोन लाख मतांपकी क्षीरसागरांना ७७ हजार मते मिळाली. सव्वा लाख मते त्यांच्या विरोधात गेली. इतक्या मोठय़ा प्रमाणात जनमत विरोधात का गेले? याचे आत्मचिंतन त्यांना करावे लागणार आहे. आष्टीतून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी जिल्हय़ातील पराभूतांपेक्षा सर्वात जास्त, १ लाख १५ हजार, तर केजच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी सर्वात कमी ६३ हजार मते घेतली. परळीत धनंजय मुंडे यांनी ७१ हजार, तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांनी ७४ हजार मते घेतली.