एका अवलीयने आयटी मधील चकचकीत इमारतीत आपली भाजी विकायची असे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांसह देश-विदेशात ते या वेगवेगळ्या भाज्या पोहचवतात. मूळ परदेशात पिकवल्या जाणाऱ्या या भाज्यांचे पिक घेऊन एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले आहे. या भाज्यांच्या पिकातून त्यांना थोडेथोडके नाही तर वार्षिक ६ कोटी रुपये उत्पन्न मिळते. सगळा खर्च जाऊन त्यांना १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आळंदी येथील चऱ्होली खुर्द येथे राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे जयसिंग थोरवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या या व्यवसायाबाबत सांगताना थोरवे पत्नीची मोठी साथ असल्याचं आवर्जून सांगतात. आपली पत्नी मालन हिने आपल्याला या आधुनिक शेतीमध्ये मोठी मदत केल्याने हे फळ मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर आपल्यासोबत आजुबाजूच्या काही शेतकऱ्यांनाही त्यांनी अशापद्धतीच्या परदेशी भाज्यांची शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. जयसिंग आणि मालन थोरवे यांच्या या अनोख्या कामामुळे त्यांना यावर्षीचा आधुनिक शेती संबंधीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणारा पुरस्कार मिळाला आहे. या कामगिरीमुळे थोरवे कुटुंबाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

जयसिंग थोरवे लहान असताना आजीसोबत भाजी विकायला जायचे. शालेय वयापासूनच भाजीपाल्याची आवड निर्माण झाल्याने मोठेपणी आपण यातच काहीतरी करायचे असे जयसिंग यांनी ठरवले. याच क्षेत्रात झोकून देऊन काम केल्यामुळे त्यांना व्यवहारीक ज्ञान मिळाले. हिंजवडी येथे एका नातेवाईकांकडे गेलेले असताना जयसिंग यांना आयटी हबच्या उंचच उंच आणि चकचकीत इमारतींनी आकर्षित केले. त्यावेळी आपण याठिकाणी येऊन आपली भाजी विकायची असे स्वप्न त्यांनी गाठीशी बांधले. पण आयटी क्षेत्रात प्रवेश मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. मग जयसिंग यांनी आयटी क्षेत्राशी निगडित कोर्स केले आणि एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली. कालांतराने कंपनी बंद पडल्याने नोकरी गेली. नुकतेच लग्न ठरलेल्या जयसिंग यांनी आपली नोकरी गेल्याचे होणाऱ्या पत्नीला सांगितले. मात्र आपल्याकडे शेती आहे असे म्हणत मालन यांनी त्यांना अतिशय चांगली साथ दिली.

आयटी क्षेत्रात काम केल्याने तेथील कर्मचाऱ्यांना परदेशी भाजी आवडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मग परदेशात नेमक्या कोणत्या भाज्या कशा पद्धतीने पिकवल्या जातात याबाबत त्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने माहिती घेतली. मग सुरु झाला त्यांचा खरा प्रवास. जयसिंग यांनी आपल्या १२ एकर जमिनीत या परदेशी भाज्यांचे पिक घेण्यास सुरुवात केली. बरेच कष्ट घेतल्यानंतर त्यांना यात यश आले. आज मोठमोठ्या कंपन्या, मॉल याठिकाणी त्यांच्या भाज्या विकल्या जातात. पत्नी मालन यांनी इतर दोनशे शेतकऱ्यांना याचे प्रशिक्षण दिले,शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना भाज्यांचं उत्पन्न घेण्यास सांगितले, त्यांना बाजार पेठ मिळवून देण्याचे काम जयसिंग करतात. जयसिंग यांच्याकडे तब्बल ३७ प्रकारच्या परदेशी जातीच्या भाज्या आहेत. यात रेड कॅबेज, आईस बर्ग, रोमिनो, चेरी टोमॅटो यांचा समावेश आहे. येथील शेतकऱ्यांना या पिकामुळे जवळपास एकरी साडेचार लाख रुपये मिळतात. यामुळे शेतकरीदेखील खुश आहेत असे थोरवे यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले.

थोरवे यांच्या या भाज्या भारतातील गोवा, दिल्ली, बेंगळुरु, हैद्राबाद येथे जातात तर दुबई, युरोप, रशिया याठिकाणीही जातात. आपला हा वाढता व्यवसाय सांभाळताना दमछाक होत असल्याने त्यांनी आपल्या लहान भावालाही नोकरी सोडायला लावून या व्यवसायात आपल्यासोबत घेतले आहे. एकीकडे दुष्काळ आणि शेतात उत्पन्न मिळत नाही म्हणून मराठवाडा, विदर्भ येथे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे थोरवे यांची यशोगाथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaysing thorve farmer in alandi charholi earn 6 crores for year by taking foreign crop farming
First published on: 21-07-2018 at 14:40 IST