पुणे- वास्तुरचनाशास्त्र (आर्किटेक्चर) अभ्यासक्रमासाठीच्या जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेतील पेपर दोनचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील समीक्षा चंडालिया देशात २३ वी आणि महाराष्ट्रात पहिली आली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) ही परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी आणि एप्रिल अशी दोन वेळा ही परीक्षा झाली. त्यात १ लाख ४५ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी जानेवारीत झालेली परीक्षा, तर १ लाख ४४ हजार ३२ विद्यार्थ्यांनी एप्रिलमधील परीक्षा दिली होती.

देशभरातील ३७३ आणि देशाबाहेरील नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दोन्ही परीक्षा दिलेल्या ६१ हजार ५१० विद्यार्थ्यांपैकी २७ हजार ६२४ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली. दोन्ही परीक्षांतील गुण विचारात घेऊन पहिले चार क्रमांक पटकावलेले विद्यार्थी आंध्र प्रदेशातील आहेत. त्यात गोल्लापुड्डी लक्ष्मी नारायणने पहिला, कोरापटी निखिल रत्नाने द्वितीय, सिकम रितेश रेड्डीने तृतीय आणि गुड्ला रेड्डीने चौथा क्रमांक मिळवला.