‘जेईई’च्या विद्यार्थ्यांना यंदा वाहतूक सुविधेची चिंता

मुंबई : आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी आता परीक्षेच्या नियोजनातील गोंधळामुळे विद्यार्थी जेरीस आले आहेत.   करोना संसर्गाची धास्ती आणि त्यातच दूरचे परीक्षा केंद्र मिळाल्यामुळे सध्याच्या अपुऱ्या वाहन व्यवस्थेत तेथे वेळेत पोहोचायचे कसे, या चिंतेने विद्यार्थी आणि पालकांना ग्रासले आहे.

देशभरात १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत जेईई मुख्य परीक्षा होणार आहे. मात्र, अभ्यासाऐवजी परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे हा प्रश्न सर्वच विद्यार्थ्यांसमोर आहे. अनेक विद्यार्थ्यांना दूरवरची केंद्र मिळाली आहेत.  काही विद्यार्थ्यांना परगावची केंद्र मिळाली आहेत. मर्यादित केंद्रांमुळे परीक्षेला पोहोचण्याचीच परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अधिक कठीण ठरणारी आहे.

राज्यातील १ लाख १० हजार ३०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मात्र, त्यांच्यासाठी जेमतेम १३७ केंद्र उपलब्ध आहेत. मुंबईत लोकलसेवा के वळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांना उपनगरी रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 अडचणींचा डोंगर..

अद्यापही राज्यात सगळीकडे वाहतुकीच्या सुविधा पूर्ववत झालेल्या नाहीत. त्यामुळे परगावी परीक्षा केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसमोर वाहतुकीच्या अडचणी आहेत. परीक्षेच्या वेळेपूर्वी दोन तास परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजताच्या सत्रातील विद्यार्थ्यांना ७.४५ वाजताच केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे परगावी केंद्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीच परीक्षेच्या ठिकाणी जावे लागेल. मात्र, हॉटेल्स बंद असल्यामुळे राहायचे कुठे असाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. मुंबईत लोकल रेल्वे सुरू नाहीत. खासगी वाहने अवाच्या सव्वा दर आकारत असल्याचे पालकांनी सांगितले.

कोट वापरणे..

‘विद्यार्थ्यांना दूरवरची केंद्र मिळाली आहेत. वाहतूकीच्या सुविधा नाहीत. दूरचा प्रवास करणेही सुरक्षित नाही. केंद्रावरही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आखलेली नियमावली पुरेशी होणार का, त्याची अंमलबजावणी होणार का याबाबत प्रश्न आहेत.’

–  अ‍ॅड. अनुभा सहाय, पालक प्रतिनिधी

संभ्रमच अधिक..

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लक्षणे, करोना प्रादुर्भाव अशा सर्व बाबींची माहिती देणारे घोषणापत्र घेण्यात येत आहे. शिक्षण मंत्रालयाने परीक्षा घेण्याची भूमिका घेताना प्रत्येक परीक्षा केंद्रावर लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कक्ष राखून ठेवण्यात येणार असल्याचे यापूर्वी सांगितले आहे. मात्र, याबाबत प्रवेशपत्रात उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. त्यांना प्रवेश पत्र, पारदर्शक बॉलपेन, पारदर्शक पाण्याची बाटली केंद्रावर नेता येणार आहे. केंद्रावर प्रत्येक परीक्षार्थीला मुखपट्टी देण्यात येणार असून त्यांनी वापरलेली मुखपट्टी त्यांना परीक्षा केंद्रात नेता येणार नाही, असेही प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

देशातील विद्यार्थीसंख्या – भाग १ (अभियांत्रिकी): ८ लाख ४१ हजार १८१, भाग २ (वास्तूकला) : १ लाख १२ हजार १५८

परीक्षा केंद्र – भाग १ (अभियांत्रिकी): ६१०, भाग २ (वास्तूकला) : ४९४

राज्यातील विद्यार्थीसंख्या – भाग १ (अभियांत्रिकी): ९६ हजार १४१, भाग २ (वास्तूकला) : १४ हजार १९२

परीक्षा केंद्र – भाग १ (अभियांत्रिकी): ७१, भाग २ (वास्तूकला) :

देशातील २३२ शहरांमध्ये परीक्षा होईल.

राज्यात  नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा येथे परीक्षा होईल.

गोंधळ काय?

ठाण्यातील काही विद्यार्थ्यांना पुणे केंद्र मिळाले. केंद्र निवडताना पुण्याचा पर्याय तिसरा दिला होता. मात्र, तोच पर्याय मिळाल्यामुळे पुण्याला जावे लागेल. नगरच्या काही विद्यार्थ्यांना पुणे आणि औरंगाबाद केंद्र मिळाले. कोल्हापूर, कोकण येथील विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या जिल्ह्य़ातील केंद्र मिळाली आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांनाही शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेली परीक्षा केंद्र मिळाली आहेत. वसईतील एका विद्यार्थ्यांला नेरळ, अंधेरी येथील विद्यार्थ्यांला कोपरखैरणे, भायखळा येथील विद्यार्थिनीला पवई तर मुलूंड येथील विद्यार्थिनीला कांदिवलीला परीक्षेला जावे लागणार आहे.