कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावरील फॅब्रिकेशनचे काम करणारा  परप्रांतीय ठेकेदार नुरल सरदार अन्सारी (वय ३२ वर्षे रा. बिहार) याचे १८ एप्रिल रोजी तीन अज्ञात खंडणीचोरांनी  २५ लाख रुपयांसाठी अपहरण केले होते. या प्रकरणी पोलिसांना घटनेनंतर पंधरा दिवस उलटले तरी काहीच धागेदोरे  सापडलेले नाहीत़  आरोपी स्थानिक असून काही पोलीस कर्मचा-यांना ते माहीत आहेत व तेच आरोपींच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व तपास अधिकारी श्री चंचले यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र अद्याप धागेदोरे मिळत नसल्याचे सांगितले.
दरम्यान या गुन्हयात वापरलेली टाटा सुमो (क्रमांक एम एच २३ एन ५४५०) या गाडीचा मालक अण्णा भागवत कोटुळे (राहणार तळी पिंपळगाव, तालुका पोटोदे, जिल्हा बीड) हा मात्र फरार झाला आहे.
  कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर मागील तीन वर्षांपासून अन्सारी हा फॅब्रिकेशनचे काम करीत आहे.  तो स्वत: ठेकेदार असून त्याच्याकडे  दहा मजूर काम करीत आहेत. याचे २५ लाख रुपयांसाठी १८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता तो कारखान्याच्या गेटच्या बाहेर असलेल्या हॉटेल समोर चहा पिण्यासाठी उभा असताना अपहरण करण्यात आले होते. त्याला तीन दिवस विविध ठिकाणी फिरवण्यात आले. मात्र २१ एप्रिल रोजी अन्सारी याने  शिताफीने सुटका करून घेतली. त्यांनतर कर्जत पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात फिर्यादही देण्यात आली. पोलिसांनी आरटीओकडून जीप  मालकाचे नाव मिळवण्यास विलंब का लावला, त्यानंतर आरोपींची जीप देखील काल २ मे रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली. याशिवाय जीपमालकाला पकडण्यासाठी घटनेनंतर काल २ मे रोजी १४ दिवसांनी पोलीस गेले तोपर्यंत आरोपी फरार झाला आहे.