|| प्रकाश खाडे

जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाची पौष पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली, मात्र दरवर्षीप्रमाणे पौर्णिमा यात्रेनिमित्ताने भरणारा पारंपरिक गाढव बाजार भरला होता. त्यात हजाराच्या आसपास गाढवांची विक्री झाली. मात्र, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या या गाढव बाजारावर यंदा मंदीचे सावट जाणवले. करोनातील टाळेबंदीमुळे बांधकाम क्षेत्राला आलेली मरगळ, मजुरांचे स्थलांतर याचा परिणाम बाजारावर झाला. बाजारात विक्रीसाठी गाढवे मोठ्या प्रमाणात आली, परंतु खरेदीसाठी व्यापारी कमी आल्याने आर्थिक उलाढाल कमी झाली.

गावठी गाढवांना १० ते २० हजार रुपये तर काठेवाडी गाढवांना २० ते ५५ हजार रुपये भाव मिळाला. गुजरातहून आलेल्या १०० काठेवाडी गाढवांची या वेळी विक्री झाली. गेल्या चार दिवसांपासून येथील बंगाली पटांगणामध्ये गाढव बाजार भरला होता. या वेळी एक हजार गाढवांची खरेदी-विक्री होऊन दीड ते दोन कोटींची उलाढाल झाली. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र आदी राज्यातून व्यापारी आले होते. यामध्ये प्रामुख्याने वैदू, बेलदार, कैकाडी, माती वडार, गारुडी, मदारी, कुंभार आदी समाज बांधवांचा समावेश होता. सातारा, कराड, नगर, पुणे, सांगली, इंदापूर, बारामती, फलटण आदी भागातून अनेक व्यावसायिक गाढवे खरेदीसाठी आले होते. यापूर्वी येथे वैदू व भातु कोल्हाटी समाजाच्या पारंपरिक जातपंचायती भरत होत्या परंतु या जातपंचायतींना कायद्याने बंदी आल्याने त्या आता बंद झालेल्या आहेत मात्र गाढव बाजार भरवला जात आहे. दिवसेंदिवस गाढवांची संख्या घटत चालल्याने त्याचा बाजारावर परिणाम जाणवत आहे. गाढव बाजारासाठी मोठे पटांगण उपलब्ध व्हावे, या ठिकाणी पाणी व विजेची व्यवस्थित सुविधा मिळावी आदी मागण्या वडार समाजाचे प्रमुख विजय चौगुले, नारायण जाधव, विजय पवार, दीपक पवार यांनी केल्या.

टाळेबंदीनंतरच्या मंदीमुळे उलाढाल कमी दूध व्यवसायासाठी गाढवांची खरेदी पुणे येथे गाढवाच्या दुधाचा व्यवसाय करणारे रमेश जाधव यांनी १५ हजार रुपये प्रमाणे दुभत्या गावरान गाढवीण खरेदी केल्या. त्यातील एकीने गुरुवारी सकाळी बाजारातच पिल्लाला जन्म दिला. जाधव हे वर्षभर दुधाचा धंदा करतात. गाढविणीच्या दुधाचा दर दोन हजार रुपये लिटर असून अनेक आजारावर हे दूध गुणकारी असल्याचे सांगितले जाते.

गाढवांचे महत्त्व  अद्यापही कायम

सध्याच्या यांत्रिक युगात दगड, माती, मुरूम, वाळू, सिमेंट पोती व अवजड साहित्य वाहून नेण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर केला जात असला, तरी गाढवांचे महत्त्व कमी झालेले नाही . उंच डोंगरदऱ्यांमध्ये, अडचणीच्या ठिकाणी, वीटभट्ट्यांवर अजूनही गाढवांचा उपयोग केला जातो. काठेवाडी जातीच्या गाढवांची ताकद जास्त असल्याने ती एकावेळी ५० ते ६० किलोचा बोजा वाहून नेऊ शकतात. त्यामुळे त्यांना मागणी जास्त असते.