महाराष्ट्राचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या प्राचीन खंडोबा मंदिरातील मुख्य दगडी छताच्या आधारासाठी असलेल्या दगडी तुळयांना काही ठिकाणी तडे गेले असल्याने मंदिराला धोका निर्माण झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून गाभाऱ्यावरील छत धोकादायक अवस्थेत असून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
पावसाळ्यात या छतामधून मंदिराच्या गाभाऱ्यात व गडकोटाच्या ओवऱ्यामध्येही मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होते. शासनाने पाच वर्षांपूर्वी खंडोबा गड जतन करण्यासाठी व भाविकांच्या सुविधांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामे सुरू करण्यात आली. संरक्षक िभत, पर्यायी पायरी मार्ग, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात आली. मात्र गडाच्या दुरुस्तीच्या कामाला मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. वास्तविक मुख्य मंदिराच्या छताची दुरुस्ती व गडकोटाचे वॉटरप्रूफिंग ही कामे प्राधान्याने पहिल्या टप्प्यात होण्याची गरज होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यापूर्वी झालेल्या भूकंपामध्ये गडाच्या पायऱ्यांवरील काही दीपमाळा कोसळून पडल्याची उदाहरणे आहेत.
मुख्य स्वयंभू िलगाच्या मंदिरावर शिखरामध्ये महादेवाचे शिविलग आहे. महाशिवरात्रीला शिडी लावून हजारो भाविक धोकादायक छतावरूनच या शिविलगाच्या दर्शनासाठी जातात.
दप्तर दिरंगाई कारणीभूत ?
खंडोबा मंदिराच्या गडकोटांचे सज्जा, सभामंडप, मुख्य मंदिर कळसाच्या बाजूचे वॉटर प्रूिफग करणे, दसरा पालखीसोहळा प्रदक्षिणा मार्गावर पेिव्हग ब्लॉक बसवणे आदी कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे एक कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जेजुरी नगरपालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे या कामास विलंब होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 3:07 am