श्रीरामपूर : पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या छळास कंटाळून शहरातील गोरख दिगंबर मुंडलिक (वय ५०) यांनी आज दुकानात पोलिसांसमोरच विष प्राशन केले. मुंडलिक यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मुंडलिक यांना यापूर्वी सात ते आठ वेळा चोरीचे सोने घेतले म्हणून मालेगाव, नगर, अकोले तसेच अन्य काही ठिकाणच्या पोलिसांनी ताब्यात घेऊ न त्यांच्याकडून सोने हस्तगत केले होते. शहरातील काही आरोपी अटक केल्यानंतर मुंडलिक यांचे नाव घेत. पोलीस त्यांना ताब्यात घेऊ न पैशाची मागणी करत. या प्रकाराला ते वैतागले होते. त्यांनी त्यामुळे दुकानाचे मुंडलिक ज्वेलर्स हे नाव बदलून अंबिका ज्वेलर्स हे नाव केले होते. तसेच चोरीचे सोने न घेता पोलिसाच्या वारंवार होणाऱ्या छळाला त्रासून दागिन्याचा धंदा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंडलिक यांचे सोनार गल्लीत दुकान असून आज संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पंकज निकम हे चार पोलीस व आरोपी मुस्लीम कुरेशी याच्यासह आले. त्यांनी मुंडलिक यांना तुम्ही चोरीचे ३०० ग्रॅम सोने घेतले आहे असे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या छळवणुकीमुळे त्रस्त झालेल्या मुंडलिक यांनी दुकानात ठेवलेली विषाची बाटली काढून विष प्राशन केले. या प्रकाराने पोलीस व दुकानदार अवाक् झाले. हेमंत दहिवाळ, मनोज चिंतामणी, सोमनाथ महाले, दिलीप नागरे यांनी त्वरित मुंडलिक याना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुंडलिक यांना पकडण्यासाठी आलेले उपनिरीक्षक पंकज निकम हे शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तेथे नोंद केली. त्यानंतर मुंडलिक उपचार घेत असलेल्या साखर कामगार रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेनंतर शहरातील सराफ बाजार बंद करण्यात आला. बेलापूर, नेवासे, संगमनेर येथील दुकाने बंद करण्यात आली. उद्या जिल्ह्यत सराफ संघटना बंद पाळणार आहेत. आज अप्पर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, निरीक्षक संपत शिंदे यांनी सराफांची बैठक घेऊ न चर्चा केली. या वेळी जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, हेमंत दहिवाळ, उमेश मैड, सोमनाथ महाले, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरुडे, श्रीपाद बोऱ्हाडे, दिलीप नागरे, उमाकांत लोळगे, मनोज चिंतामणी, गौरव महाले, राजन माळवे आदींशी चर्चा केली. पोलिसांकडून होत असलेल्या छळाबद्दल या वेळी तक्रोरी केल्या.

इराणी टोळीचा उद्योग

शहरातील इराणी टोळी दागिने चोरी व फसवणुकीचे काम करते. देशातील विविध ठिकाणी त्यांना अटक करण्यात येते. ही टोळी शहरातील सराफांना सोने विकल्याचे पोलिसांना सांगते. त्यानंतर पोलीस शहरात येतात. सराफांना छळतात. सोने मागतात. तसेच पैसेही उकळतात. पोलिसांना पैसे मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक खोटी नावे टोळी पोलिसांना देते. त्या मोबदल्यात त्यांना पोलीस मारहाण करीत नाहीत. हा प्रकार गंभीर असून खाकी वर्दीतील पोलीस खंडणी उकळत आहेत, असा गंभीर आरोप सराफांनी आज पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना केला.