सोलापूर : मैत्री आणि कौटुंबिक संबंधातून विश्वास निर्माण करून नाशिकच्या सराफी व्यावसायिकाला सोलापुरात टोलेजंग निवासी संकुल बांधून देतो आणि सदनिकांची विक्री करून प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १९ कोटी रुपयांस फसविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. एवढेच नव्हे तर फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी सराफ व्यावसायिक आपल्या पत्नीसह गेला असता मित्राने अश्लील शिवीगाळ करून धमकावले आणि पत्नीचा विनयभंगही केला. या गुन्ह्यची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

अमोल सुरेश यादव (रा. युनिटी आयकॉन अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीत हा फसवणुकाचा प्रकार घडला.

या संदर्भात नोंद झालेल्या फिर्यादीनुसार यादव याने नाशिक येथील ओळखीच्या सराफी व्यावसायिकाशी मैत्री करून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. मित्राकडे प्रचंड पैसा असल्याने त्यावर डोळा ठेवून यादव याने त्या मित्राला मजरेवाडी-जुळे सोलापूर परिसरातील बॉम्बे पार्कजवळ भूखंड खरेदी करून टोलेजंग निवासी संकुल उभारण्याची आणि त्यातून मोठा नफा कमावण्याची कल्पना सुचविली. पुरेशी खात्री करून सराफी व्यावसायिकाने मित्रावर विश्वास दाखवत बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे ठरविले. त्यानुसार २३०५ चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड खरेदी करून त्यावर निवासी संकुल उभारण्यात आले. त्यासाठी २०१३ ते २०१९ या कालावधीत वेळोवेळी मिळून मित्राने बांधकामाची प्रगती दाखवत तब्बल १९ कोटी ७ लाख ७८ हजार ५७० रुपये उकळले. ठरल्याप्रमाणे टोलेजंग निवासी संकुल उभे राहिले. परंतु मित्राने सराफी व्यावसायिकाच्या नावे बनावट सह्य करून खोटी आणि बोगस कागदपत्रे तयार केली आणि निवासी संकुलातील सदनिकांची परस्पर विRीही केली. त्याची रक्कम न देता हडपली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या सराफी व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह सोलापुरात येऊ न मित्राची भेट घेतली आणि जाब विचारला. परंतु घेतलेली रक्कम परत न देता मित्राने भांडण काढत धमकावले. पत्नीला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंगही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.