श्रीरामपूर : चोरीच्या तपासासाठी आलेल्या पोलिसांना पाहताच सलाबरपूर (ता. नेवासे) येथील सुजित सुभाष कपिले या सराफाने विषारी औषध प्राशन केले. कपिले यांची प्रकृती गंभीर असून नेवासे फाटा येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कपिले यांच्यावर नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील गुन्हे शाखेच्या पथक क्रमांक १ च्या अधिकाऱ्यांनी अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील सोमनाथ चोबे या सोन्याच्या साखळीची चोरी करणाऱ्या आरोपीला नुकतेच पकडले. चोबे हा मोक्का खटल्यात आरोपी असून जामिनावर सुटला आहे. त्याने यापूर्वी शेकडो सोनसाखळ्यांच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याने चोरीचे सोने सलाबतपूर येथील सराफ कपिले यांना विकल्याचे सांगितले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे पथक तपासासाठी आले होते.

पथक आल्याचे पाहताच सुजित हा अडुळसा या औषधाचे वेस्टन असलेली बाटली घेऊन आला. त्याने ‘मला अटक केली तर मी विष प्राशन करीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर सुजित याने बाटलीत असलेले विष प्राशन केले. या बाटलीत आयुर्वेदिक औषध नव्हते. तर रोगर हे जहाल कीटकनाशक होते. सुजितच्या आईने ‘माझ्या मुलाला रुग्णालयात दाखल करा’, असे सांगितले. त्यानंतर पथकाने नेवासे फाटा येथील रुग्णालयात सुजितला दाखल केले.

सुजितच्या आईची तक्रार

‘पोलिसांनी माझा मुलगा सुजित याला त्रास दिला. चोरीचे सोने घेतले नसताना अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याने विष प्राशन केले. माझ्या मुलास काही बरेवाईट झाले तर त्याला पोलीस जबाबदार राहतील’ असे सुजितची आई सुवर्णा सुभाष कपिले यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.