महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे ‘मराठी भय्ये’ काही न्यूज चॅनल्स आणि भाजपा नेते माफी मागणार का असा प्रश्न आता जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करुन त्यांनी भाजपावर टीका केली आहे. “सुशांत सिंह प्रकरणात काही न्यूज चॅनल्स, मराठी भय्ये आणि भाजपा नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयनेच मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये आता माफी मागणार का?” असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

मराठी भय्ये हा आव्हाडांनी केलेला उल्लेख नेमका कुणाबाबत आहे याबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी आत्महत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे. सुशांत हा बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा बळी आहे. बॉलिवूडमधल्या कंपूशाहीने त्याचा बळी घेतला आहे अशी टीका झाली. यासंदर्भातले वृत्तही काही वाहिन्यांवर झळकले. त्यानंतर तडकाफडकी हा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान एम्स रुग्णालयाने सुशांतचा मृ्त्यू ही आत्महत्याच आहे असा अहवाल दिला. ज्यानंतर आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून भाजपावर टीका होते आहे.

एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला. या अहवालात त्यांनी सुशांतने आत्महत्या केली असून त्याच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे. याआधी एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विष प्रयोग झाल्याचा दावा फेटाळून लावला होता. या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा म्हणजे सत्य लोकांसमोर येईल अशी मागणी केली होती. सीबीआय काय अहवाल देणार याची प्रतीक्षा आम्हीही करतो आहोत असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं. दरम्यान एम्सचा अहवाल आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका केली आहेच शिवाय आता मराठी भय्ये माफी मागणार का असाही प्रश्न विचारला आहे. मराठी भय्ये हा त्यांनी नेमका कुणाचा उल्लेख केला आहे याबाबत चर्चा रंगली आहे.