रत्नागिरीतल्या चिपळूमध्ये असलेले तिवरे धरण खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे फुटले असा जावईशोध लावणारे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आणि आनंद परांजपे यांनी खेकडे पकडून ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात दिले. हेच ते खेकडे आहेत ज्यांनी धरण फोडले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी उपरोधिक मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली. यासंदर्भातले फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी बेशरम सरकार हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.

तिवरे धरण फुटल्याने २३ निष्पाप गावकऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. दुर्घटना घडल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात पुढाकार घेण्याऐवजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी धरणफुटीसाठी खेकड्यांना जबाबदार धरले आहे. मी अधिकाऱ्यांशी आणि काही गावकऱ्यांशी बोललो. काही गोष्टी आपल्या हाती नसतात.हा अपघात होता, खेकड्यांनी धरण पोखरले होते अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली. ज्यानंतर सोशल मीडियावर तानाजी सावंत हे चांगलेच ट्रोल झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी तर थेट खेकडे पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि हेच ते धरण फोडणारे खेकडे आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी उपरोधिक मागणी केली.

एकीकडे २३ जणांचा बळी गेलेला असताना राज्य सरकारकडून असे अजब दावे केले जात आहेत. हे बेशरम सरकार आहे त्यांना दुसरा शब्दच नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. या आंदोलनात आनंद परांजपे, सुजाता घाग, हेमंत वाणी यांनी सहभाग घेतला होता.