08 July 2020

News Flash

ट्रम्प यांची मी निंदा करतो; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची टीका

साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर काय म्हणाले ट्रम्प?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय भारत दौऱ्याला आजपासून (२४ फेब्रुवारी) सुरूवात झाली. ट्रम्प यांचं सोमवारी दुपारी अहमदाबादमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अहमदाबाद भेटीदरम्यान ट्रम्प यांनी साबरमती आश्रमातही वेळ घालवला. तसेच अभिप्रायही नोंदवला. मात्र, या अभिप्रायवरून नवा वाद सुरू झाला आहे.

अहमदाबाद विमानतळावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमतीमधील गांधी आश्रमाला भेट दिली. यावेळी ट्रम्प यांनी सुतकताई केली. तसेच परिसरात फेरफटका मारत आश्रमात वेळ घालवला. आश्रमाला भेट दिल्यानंतर ट्रम्प यांनी तेथील नोंदवहीत अभिप्रायही नोंदवला. मात्र त्यांनी नोंदवलेल्या अभिप्रायावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

त्यावर सोशल मीडियातून नाराजीचा सूर उमटू लागला असून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या अभिप्रायावर टीका केली आहे. “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. साबरमतीची ओळख जगभरात एका नावानं आहे, ते म्हणजे महात्मा गांधी. परंतु, हा आश्रम ज्या एका नावामुळे ओळखला जातो, त्या महात्मा गांधीजींचा साधा उल्लेखही केला नाही. यामुळे भारतातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व गांधीवाद्यांची मन दुखावली आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी त्यांची माफी मागावी. ट्रम्प यांना भारताचा इतिहास माहित नसेल, तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. ट्रम्प यांची मी निंदा करतो,” असं आव्हाड म्हणाले.

ट्रम्प यांनी काय लिहिलं होतं?

‘माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही अविस्मरणीय भेट घडवल्याबद्दल आभार,’ असा अभिप्राय डोनाल्ड ट्रम्प यांनी नोंदवहीत लिहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 6:15 pm

Web Title: jitendra awhad criticized donald trump bmh 90
Next Stories
1 कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणास प्रारंभ
2 प्रतीक्षा संपली! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांची नावं
3 …म्हणून वडिलांनी DJ च्या तालावर काढली २२ वर्षीय मुलाची अंत्ययात्रा
Just Now!
X