शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. बाबासाहेब पुरंदरेंना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करुन शिवप्रेमींच्या भळभळून वाहणाऱ्या जखमेवर मीठ चोळले असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी शिवविचारांनी महाराष्ट्र पेटवणार अशी धमकीच दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

ट्विटरवर त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘शिवद्रोही ब.मो. पुरंदरेंना पद्मविभुषण जाहिर….छत्रपतींच्या इतिहासासाठी लाजिरवाणी गोष्ट…महाराजांची बदनामी करणाऱ्याला सरकार पोसतंय’. पुढच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र पेटवणार….परत एकदा….शिवसन्मान परिषदा घेणार. या ट्विटमध्ये त्यांनी श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांच्या नावे हॅशटॅग केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात ते बोलत आहेत की, ‘महाराष्ट्र भूषण दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय?. जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. त्यांनीच जेम्स लेनला माहिती पुरवली होती. सोलापुरात त्यांनी पुस्तकाचं कौतुक केलं होतं. दर दोन-चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत जर पडद्यावर अणत असाल, पुरस्काराने गौरवित करणार असाल तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत याबाबत सर्वसामान्यांचा मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार’.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे.