देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. करोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी शासनाकडून वारंवार मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वच्छता राखणे अशा विविध प्रतिबंधक उपायांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र तरीही नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. याच संदर्भातला एक व्हिडिओ महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये काही पक्षी एकत्र बसलेले दिसत आहेत. मात्र, त्यांनी एकमेकांमध्ये ठराविक अंतर ठेवलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आव्हाड यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात की, पक्षांनाही सोशल डिस्टन्सिंग कळलं. पण माणसांना कधी कळणार?

Social Distancing well understood by birds … when will human beings understand pic.twitter.com/7cI40guvvH

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 16, 2021

देशात तसंच राज्यातही पर्यटन स्थळांवर नागरिक फिरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी मास्क लावणं, सुरक्षित अंतर अशा कोणत्याही नियमाचं पालन करत नाहीत. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच लोणावळा आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच स्थानिक प्रशासनाकडूनही करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र, अनेक नागरिक हे नियम धाब्यावर बसवून मौजमजा करताना दिसून येत आहेत.