दिगंबर शिंदे

करोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. जेवत्या ताटावरून उठण्याची वेळ काही जणांवर आली. मात्र भटक्या श्वानाने अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडण्याचा प्रकार इस्लामपुरातील कापूसखेड मार्गावरील स्मशानभूमीत घडला आणि त्यामुळे एका कुटुंबाच्या भाकरीची सोय झाली.

करोनाने मृत्युमुखी पडलेल्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यास पुढे कोणी येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. नातेवाईकही दूर राहतात. किंबहुना संसर्ग टाळण्यासाठी हे गरजेचेच आहे. यासाठी मोठय़ा शहरांमध्ये विद्युत दाहिनी असलेल्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करणे सोयीचे गेले परंतु जिथे प्रत्यक्ष चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पद्धत आहे, अशा ठिकाणी हे कार्य करणे सुरुवातीपासूनच एक आव्हान ठरले आहे. यासाठी तालुकास्तरावर एखादी स्मशानभूमी करोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच राखून ठेवण्यात येऊ लागल्या. मात्र अशा स्मशानभूमीतील हे विधीही केवळ उपचार पाळण्यापुरते करत लोक पळ काढताना दिसत आहेत.

इस्लामपूरमध्ये करोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कापूसखेड मार्गावरील स्मशानभूमी आरक्षित करण्यात आली आहे. मात्र गेल्या महिन्यात इथेही अंत्यसंस्काराचा उपचार करत पळ काढण्याच्या वृत्तीने अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे भटक्या कुत्र्यांकडून लचके तोडण्याची घटना उघडकीस आली. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आणि व्यवस्थेवर टीकाही होऊ लागली. यावर मग इस्लामपूर नगरपालिकेने या प्रकारच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र व्यक्ती नेमण्याचा निर्णय घेतला. पण, हे काम म्हणजे प्रत्यक्ष करोनाशीच दोस्ती करण्याचा प्रकार असल्याने पुढे येण्यास कोणी धजावत नव्हते. मात्र करोनामुळेच नोकरी गमावलेले दिलीप सावंत या कामासाठी पुढे आले. त्यांनी हे काम स्वीकारले. या कामामुळे घरचे, शेजारचे अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी घरादाराचाही त्याग केला आणि चक्क स्मशानभूमीतच मुक्काम ठोकला. घरची मंडळी दोन वेळचा डबा आणून तिथेच दूरवर ठेवून त्यांना पोहोच करतात. गेल्या एक महिन्यात त्यांनी तब्बल १२० करोनाबाधित मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी त्यांना प्रति पार्थिव ९ हजार रुपये देण्याचे ठरले आहे. मात्र या पैशातूनच त्यांनी अंत्यसंस्काराचे सामान, करोनापासून बचावासाठी स्वत:च्या सुरक्षेचे साहित्यही (पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क) खरेदी करायचे आहे. यातून उरलेल्या पैशातून ते त्यांचे घर चालवत आहेत. ज्या करोनामुळे सावंत यांची नोकरी गेली, त्याच करोनाने त्यांना रोजगाराचे हे नवे साधनही दिले आहे. घरची चूल पेटती राहावी यासाठी त्यांनी आता हे चितेला अग्नी देण्याचे काम स्वीकारले आहे.