लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका वारसाला एसटी महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर परिपत्रकही जारी केले आहे. शैक्षणिक अहर्ता, शारिरीक पात्रता व इतर अटींनुसार महामंडळाला आवश्यक त्या पदांमध्ये वारसाला सामावून घेतले जाणार आहे.

महामंडळातील समावेशानंतर पुन्हा या योजनेअंतर्गत महामंडळातील अन्य पदांकरीता त्यांना अर्ज करता येणार नाही. वारसदार सज्ञान नसल्यास व शिक्षण घेत असल्यास त्याच्या वयाची २५ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याच्या नेमणुकीचा हक्क राखून ठेवता येईल. परंतु त्याकरीता कुटुंबाने सदरचे परिपत्रक प्रसारीत झाल्यापासून एक वर्षाच्या आत तसा अर्ज सादर करणे आवश्यक आहे असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.