लिंक्डइन LinkedIn या जगातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक नेटवर्कने आज आपला पहिला मनुष्यबळ अहवाल (व्यावसायिक आवृत्ती) भारतात प्रकाशित केला. ५० दशलक्ष सदस्य, ५०,००० कौशल्ये आणि १० लाख कंपन्या ज्या प्लॅटफॉर्मवर आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरील नावाशिवाय (अॅनॉनिमाइज्ड) आणि एकत्रित अशा विस्तृत माहितीचे विश्लेषण करून सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या/कौशल्ये आणि सर्वाधिक संधी असलेल्या भौगोलिक प्रदेशांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये मुंबई महानगरातील कल्याणमध्ये डिजिटल कौशल्य क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त प्रतिभावंतांचे स्थलांतर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यात भारतातील १४ महानगर भागातील स्थानिक प्रवाहांची माहिती दिली आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, पुणे, चंडीगढ, गुरूग्राम, जयपूर, कल्याण, कोची आणि नोएडा हे १४ विभाग आहेत.

लिंक्डइनच्या भारतासाठीच्या मनुष्यबळ अहवाल २०१८च्या सहामाही आवृत्तीतील ठळक मुद्दे:

– अभ्यासलेल्या १४ शहरांपैकी ७ शहरांमध्ये, उद्योगक्षेत्रांमधील वाढीबाबत शैक्षणिक क्षेत्र आघाडीवर आहे. वेगाने वाढ झालेल्या उद्योगक्षेत्रांमध्ये बांधकाम, सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा, वित्त, उत्पादन, कॉर्पोरेट सेवा, वाहतूक व लॉजिस्टिक्स, रिक्रिएशन आणि पर्यटन तसेच आरोग्यसेवा यांचा समावेश होतो.

– तर रिटेल, ग्राहकोपयोगी वस्तू, रिअल इस्टेट आणि मनोरंजन ही क्षेत्रे पिछाडीवर गेलेली दिसून येतात. जीडीपीच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारीमध्ये खासगी सेवांची वाढ संथ झाल्याचे दिसून आले आहे. त्याच्याशी हे सुसंगत आहे.

– सर्वाधिक मागणी असलेले व्यवसाय- सॉफ्टवेअर इंजिनीअर्स सर्वांत अनुकूल स्थितीत आहेत, त्यांच्यापाठोपाठ अॅप्लिकेशन डेव्हलपर्स आहेत. २०१८च्या पहिल्या सहामाहीत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज सर्वाधिक होती. त्यापाठोपाठ अॅप्लिकेशन डेव्हलपर्स, सोल्युशन्स कन्सल्टण्ट्स, जावा सॉफ्टवेअर इंजिनीअर्स, बिझनेस अॅनालिस्ट्स यांच्यासाठी मागणी होती.

– सर्व उद्योगक्षेत्रे आपली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी क्लाउड, अॅनालिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगशी संबंधित मनुष्यबळाचा उपयोग करून घेत आहेत.

– २०१८ सालाच्या पहिल्या सहामाहीत पोस्ट झालेल्या नोक-यांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये कोडिंग आणि डेटाबेस क्वेरिंगसारख्या तांत्रिक कौशल्यांचा समावेश होता.

– भारतातील व्यावसायिक स्थलांतरित होण्याची आघाडीची ठिकाणे म्हणजे अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड. दुस-या बाजूने, अमेरिका, यूएई आणि यूकेतून भारतात येणा-यांचे प्रमाणही सर्वोच्च आहे.

– प्रतिभेच्या देशाबाहेर होणा-या स्थलांतराचा परिणाम म्हणून, भारतातून डिजिटल कौशल्ये बाहेर गेल्याचे, तर तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगाशी संबंधित कौशल्ये भारतात आल्याचे दिसून आले.

– २०१८ सालच्या पहिल्या सहामाहीत प्रथम श्रेणी शहरांतील सर्वांत मागणी असलेले स्थलांतर कॉरिडॉर्स तयार झाले. यामध्ये कल्याणमध्ये सर्वाधिक प्रतिभावंतांनी स्थलांतर करणारे शहर ठरले, तर त्याखालोखाल बेंगळुरूमध्ये प्रतिभेचे स्थलांतर झाले. दिलेल्या भागातील पहिल्या १० सर्वाधिक पोस्टेड नोक-यांसाठी होणारे व्यावसायिकांचे स्थलांतर मागणीतील स्थलांतर कॉरिडॉर्समधून दिसून येते.

लिंक्डइनच्या आशिया पॅसिफिक आणि जपान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ऑलिव्हिअर लेग्राण्ड म्हणाले, “ज्या देशात दरवर्षी १० दशलक्ष नवीन पदवीधर मनुष्यबळाच्या क्षेत्रात प्रवेश करतात आणि जेथे रोजगारक्षम व अनुरूप राहण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये सतत वेगाने उत्क्रांत होत राहतात, तेथे मनुष्यबळाच्या बाजारपेठेने नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कार्यक्षम राहणे अपरिहार्य ठरते. यासंदर्भात सर्वांना मनुष्यबळाची मागणी व पुरवठा या दोन्ही बाजूंचा अंदाज घेण्यात लिंक्डइनच्या अहवालातील माहिती मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आम्हाला वाटते.”