News Flash

दुभंगलेली मने पुन्हा सांधणार

देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण असताना माढा लोकसभा निवडणुकीत हे नकारात्मक वातावरण झुगारून सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनी मला निवडून दिले. पैसे देऊनसुध्दा असे प्रेम मिळत

| May 22, 2014 02:40 am

देशभरात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण असताना माढा लोकसभा निवडणुकीत हे नकारात्मक वातावरण झुगारून सामान्य मतदार व कार्यकर्त्यांनी मला निवडून दिले. पैसे देऊनसुध्दा असे प्रेम मिळत नाही. त्यासाठी आत्मीयता असावी लागते. सर्वाच्या ॠणातून या जन्मातच नव्हे तर पुढच्या जन्मातसुध्दा उतराई होणे अशक्य असल्याचे भावोद्गार माढय़ाचे नवनिर्वाचित खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी काढले. सोलापूर जिल्ह्य़ातील दुभंगलेली राजकीय मने पुन्हा सांधूयात, अशी हाकही त्यांनी दिली.
माढा लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अकलूज येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोहिते-पाटील यांची जल्लोषपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली. त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी मोहिते-पाटील हे बोलत होते. विजय चौकात शोभायात्रेची सांगता होऊन त्याचे रूपांतर सत्कार सोहळ्यात झाले. यावेळी व्यासपीठावर नंदिनीदेवी मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार भाई एस. एम. पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार हणमंत डोळस, माणचे माजी आमदार सदाशिव पोळ, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, अ‍ॅड. धनाजी साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदींची उपस्थिती होती.
मोहिते-पाटील म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी मी १३ हजार किलो मीटरचा प्रवास केला. मी जनहिताचे मुद्दे मांडत असताना विरोधकांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या मुद्दय़ावर माझी खिल्ली उडविण्याचा प्रयत्न झाला. त्यास प्रत्युत्तर दिलो नाही. टीका करणाऱ्या विरोधकांची मानसिकता मतदारांनीच ओळखली आणि त्यामुळेच माझ्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. माळशिरस तालुक्यातील जनतेने तर माझ्या पत्नीपेक्षा जास्त काळजी घेतली आणि जास्त मताधिक्य दिले. या ॠणातून उतराई होणे कदापि शक्य होणार नाही. आता माढा लोकसभा मतदारसंघाचा सर्वागीण विकास हेच आपले एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. आजपर्यंत मी माणसे जोडण्याचे काम केले आहे. मधल्या काळात सोलापूर जिल्ह्य़ातील राजकीय मने दुभंगली होती. ही मने पुन्हा जुळविण्याचा व सर्वाना एकत्रपणे व विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार बबनराव शिंदे, शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष विलास घुमरे, मोहिते-पाटील यांच्या विजयाचे शिल्पकार समजले जाणारे जयसिंह मोहिते-पाटील आदींची भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 2:40 am

Web Title: joined breaking mind in solapur vijaysinh mohite patil
टॅग : Solapur
Next Stories
1 सोलापुरात पिण्याच्या पाणी प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे आक्रमक
2 गारपीटग्रस्तांसाठी उर्वरित ७१ कोटींचा निधी प्राप्त
3 गारपीटग्रस्तांसाठी उर्वरित ७१ कोटींचा निधी प्राप्त
Just Now!
X