तेलंगणातून चंद्रपुरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारूची तस्करी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र व तेलंगणा पोलिस दलाने मद्य तस्करांविरुध्द संयुक्त मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र व तेलंगणा पोलिसांची संयुक्त बैठक नुकतीच तेलंगणातील वाखळी पोलिस ठाण्यात झाली. यात रेल्वे, नदी व अन्य मार्ग सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही जिल्ह्य़ात खुलेआम मद्यविक्री सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दारूबंदी अंमलबजावणी आढावा बैठकीत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्य़ात आतापर्यंत दारूच्या ८४८ केसेस केल्या असून ५५ लाखाची दारू जप्त केली आहे. असे असले तरी जिल्ह्य़ात महिन्याकाठी किमान साडेतीन ते चार कोटी रुपयांची अवैध दारू विक्री केली जात आहे. ही संपूर्ण दारू लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व छत्तीसगडमधून आणली जात आहे. शहरातील दारू विक्रीचा सर्वात मोठा अड्डा असलेल्या कंजर मोहल्ल्यात मध्यप्रदेश व तेलंगणातून दारू उपलब्ध होत आहे. ही संपूर्ण दारू रेल्वेच्या मार्गाने महिला व बालकांची टोळी चंद्रपूर जिल्ह्य़ात आणत आहे.
ही मद्य तस्करी थांबविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने पुढाकार घेतला असून तेलंगणातून येणारी दारू थांबविण्यासाठी तेथील पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. २८ मे रोजी कागजनगर जिल्ह्य़ातील वाखळी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र-तेलंगणाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला कागदनगरचे पोलीस उपायुक्त चक्रवती, राजुराचे उपविभागीय अधिकारी राजरत्न बन्सोड, गडचांदूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार चव्हाण उपस्थित होते. सोबतच धाबा उपपोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष इंगळे, गोंडपिंपरीचे राजू बहादुरे, कोठारीचे कतलाम, विरूरचे सरकटे हे ठाणेदार उपस्थित होते. या बैठकीत दारूबंदीबाबत पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका तेलंगणा पोलिस दलाने घेतली. बैठकीनंतर तेलंगणाच्या सीमावर्ती भागात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या काही जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तेलंगणा पोलिसांनी रेल्वे व नदीचे सर्व मार्ग सील करणे सुरू केली आहे. एकदा का मार्ग सील झाले तर या जिल्ह्य़ात दारू येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी तेलंगणा पोलिस दलाच्या मदतीने हे अभियान सुरू केले आहे. दोन्ही राज्यातील पोलिस दलाच्या मदतीने तस्करांविरोधात राबविण्यात येत असलेल्या या अभियानामुळे तस्करीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात पोलिस दलाला यश आले आहे.