नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा गट-ब अखेर ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’ संयुक्त पूर्वपरीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती. मात्र, एप्रिलमध्ये करोना संसर्ग वाढल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा लांबणीवर टाकली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी होतानाही परीक्षेची नवी तारीख जाहीर केलेली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत होता. परीक्षेची तारीख जाहीर न झाल्यास क्रांतिदिनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही परीक्षार्थीनी दिला होता. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने परवानगी दिली नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात येत होते.

आता आपत्ती व्यवस्थापन विभागाने परीक्षा घेण्यास परवानगी दिल्याने परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एमपीएससी’ने आता ही परीक्षा ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचे परिपत्रक काढले आहे.