पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्रपणे पूर्व परीक्षा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी एमपीएससीला पत्र, ई-मेल पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आयोगाकडून पीएसआय, एसटीआय, एएसओ या गट ब आणि लिपिकसारख्या गट क पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. या एकत्र परीक्षेमुळे उमेदवारांना समान संधी मिळत नाही. एएसओ पदासाठी पात्र होणारे उमेदवार पीएसआय आणि एसटीआय पदांसाठीही पात्र होतात. हे उमेदवार तिन्ही मुख्य परीक्षा देतात. मात्र, त्यातील काही उमेदवार पीएसआय शारीरिक चाचणीसाठी जात नाहीत. त्यामुळे पीएसआय पदाच्या परीक्षेसाठी

तयारी करणाऱ्या उमेदवारांना संधी न मिळाल्याने त्यांचे नुकसान होते. त्यामुळे ही एकत्रित परीक्षा विभक्त करून पूर्वीप्रमाणे ती स्वतंत्रपणे घेण्यात यावी, अशी मागणी आहे.

या मागणीच्या पूर्ततेसाठी एमपीएससी प्रशासनाला पत्र आणि ई-मेल पाठवण्यात येत आहेत, अशी माहिती उमेदवार प्रतिनिधी महेश बडे आणि किरण निंभोरे यांनी दिली.