दुष्काळी परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ४५ रुपये आíथक मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी येथे केला.
मुंडे हे आज दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले की, यावर्षी पावसाअभावी खरीप व रब्बी हंगामातील पिके उद्ध्वस्त झाल्याने सध्या मराठवाडय़ात भयावह दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यावर्षीचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळासारखाच आहे. परंतु १९७२ च्या दुष्काळाला शासन ज्याप्रमाणे सामोरे गेले. त्याप्रमाणे हे शासन दुष्काळाला सामोरे जात नसल्याचे काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी दुष्काळाची पाहणी करताना सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्तेत असणाऱ्यांनी आम्ही सत्तेवर आल्यास उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा ठेवून हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात सत्तेवर आल्यास केवळ अर्धा टक्क्य़ांनीच हमीभाव वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
परभणी जिल्ह्यासह मराठवाडय़ात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कसेबसे आलेल्या गहू, ज्वारी, हरभरा, आंबा आदी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्याची मागणी त्यांनी पत्रकार बैठकीत केली. तसेच त्यांनी यावेळी सत्तेत असलेल्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे कोणी नसून हे सरकार भांडवलदारांचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्राच्या अर्थसंकल्पाविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता या अर्थसंकल्पात सामान्यांना व शेतकऱ्यांना दिलासा नसणारे काही नसून हा अर्थसंकल्प उद्योगपती व धनदांडग्यांसाठीचा असल्याचे सांगितले. दरम्यान मुंडे यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विजय भांबळे, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, प्रसाद बुधवंत, जि. प. सदस्य रामेश्वर जावळे, नानासाहेब राऊत, अशोकराव चौधरी, अजय चौधरी आदी उपस्थित होते.