येत्या १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल व पुढील वर्षांत संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होऊन मुंबईपर्यंत वाहतूक सुरू होऊ शकेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शनिवारी अमरावती जिल्ह्य़ातील शिवणी रसूलपूर येथे महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आज प्रथमच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला मी आलो आहे. या प्रकल्पाचे अप्रतिम काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा त्याचा अभिमान वाटेल असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल. टाळेबंदी काळात खंड पडेल किंबहुना कामाचा वेग कमी होईल, असे वाटले होते. पण त्या काळातसुद्धा प्रकल्पाचे काम मंदावले नाही. येत्या १ मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात मुंबईपर्यंत पोहोचू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गाची अमरावती जिल्ह्य़ातील लांबी सुमारे ७४ किलोमीटर असून, मुख्यमंत्र्यांनी पूर्ण झालेल्या कामाचीो पाहणी केली. तसेच सहा किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केला. कामाचा दर्जा, गुणवत्ता व वेग याबाबत समाधानदेखील व्यक्त केले. राज्यातील इतर रस्त्यांची बांधकामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी  सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील कामाची पाहणी

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्य़ात सुरू असणाऱ्या समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पाहणी केली. जिल्ह्य़ात प्रकल्प क्रमांक दहा या टप्प्यात ५७.९०७ कि लोमीटरचे काम प्रस्तावित होते. त्यापैकी ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.