अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ब्लॅक पँथरचे काही थक्क करणारे फोटो समोर आले आहेत. इंटरनेटवर हे फोटो व्हायरल झाले असून नेटकरी या फोटोंच्या प्रेमात पडले आहेत. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर असणाऱ्या पुण्याच्या अभिषेक पगनीस यांनी आपल्या कॅमेऱ्यात हे फोटो कैद केले आहेत. अवघ्या २० फूटावरुन त्यानं ब्लॅक पँथरला कॅमेऱ्यात कैद केलं आहे. २३ वर्षीय अभिषेक पगनीस पुण्यातील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असून फोटोग्राफी त्याची आवड आहे.

दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचे फोटो काढायला मिळल्यामुळे अभिषेक पगनीस स्वत:ला खूप नशीबवान समजत आहे. अभिषेक इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणतो की, ‘ही माझी पहिलीच वाइल्ड लाइफ ट्रीप होती. ब्लॅक पँथर स्पॉट झालेल्या ठिकाणी आम्ही तब्बल अडीच तास वाट पाहिली. ब्लॅक पँथरचं दर्शन होईल अशी आशा होती. अखेर ब्लॅक पँथर दिसला. माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. मी स्वत:ला नशीबवान समजतो कारण दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचं दर्शन झालं. ‘

अभिषेक पगनीस जून २०१९ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. त्यानं आता ब्लॅक पँथरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो चर्चेचा विषय ठरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा व्याघ्र दर्शनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी या प्रकल्पात बघायला मिळते. वाघ व बिबटय़ा सोबत आता ताडोबात ब्लॅक पँथर हा कुतूहलाचा व संशोधनाचा विषय झालेला आहे.