लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणाने तळ गाठला असून, जेमतेम दोन वेळेस पाणी देता येईल इतकेच पाणी शिल्लक आहे. पाऊस झाला नाहीतर जुलैमध्ये महिन्यातून एकदाच पाणी देता येईल, अशी स्थिती आहे.
गेल्या तीन वर्षांपासून लातूरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. गेल्या ६ महिन्यांपासून १० दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. धनेगाव धरणात चर खोदून विहिरीपर्यंत पाणी आणले जात आहे. संपूर्ण धरणात केवळ दोन दलघमी इतकेच पाणी शिल्लक असून ते एकत्र करणेही कमालीचे अवघड आहे. प्रशासनाने जूनअखेपर्यंत टंचाईचे नियोजन केले होते. पावसाने चांगलीच दडी मारली असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी हैराण झाले आहेत.
रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी धरणातील पाणी घ्यायचे ठरवले तर दिवसभरात केवळ २ दशलक्ष लीटर पाणी उपसा करण्याची सध्याची यंत्रणा आहे. १० दिवसांत केवळ २० दशलक्ष लीटर इतकेच पाणी उपसले जाईल. एकावेळी संपूर्ण शहराला पाणी पुरवण्यासाठी २४० दशलक्ष लीटर इतके पाणी लागते. त्यामुळे पाऊस झाला नाहीतर जुलै महिन्यात नळाला केवळ एकदाच जेमतेम पाणी सोडता येईल. भंडारवाडी धरणातून टँकरने पाणीपुरवठा करण्यास पर्याय राहणार नाही. पाण्याचा अपव्यय न करण्याचे वारंवार आवाहन करूनही लोकांना प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येत नसल्याची खंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर. एस. सोनकांबळे यांनी व्यक्त केली.
पाण्यासाठी त्राहि त्राहि..
१० दिवसांतून एकदा का होईना नळाला पाणी येते याचा आनंद मानण्याची सवय लातूरकरांना झाली आहे. अजूनही पाण्याचा अपव्यय ५० टक्क्यांहून अधिक होतो. पावसाची अनिश्चितता हवामान खाते व्यक्त करत असल्यामुळे व धनेगाव धरणातील पाणी संपल्यामुळे लातूरकरांना पाण्यासाठी त्राहि त्राहि करण्याची पाळी येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर करूनही वेळेवर व पुरसे पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे.