न्या. लोया यांना रुग्णालयात दाखल करताना किंवा त्यांच्या मृत्यूप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याचा सहभाग नाही, असा दावा राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात केला आहे. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता, असेही राज्य सरकारने पुन्हा एकदा  कोर्टात स्पष्ट केले.

सीबीआय न्यायालयाचे न्यायधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, न्या. लोया यांच्या मृत्यूला तीन वर्ष झाल्यानंतर एका मासिकात वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र, या वृत्तातील दावे निराधार आहे, असे त्यांनी सांगितले.

मासिकातील वृत्ताप्रमाणे लोया यांचे पार्थिव ईश्वर बाहेती नामक व्यक्तीने लोया यांच्या मूळगावी नेले होते. सरकारने नागपूरमधील तीन ईश्वर बाहेतींचा शोध घेतला. यातील एका ईश्वर बाहेतींची गेल्या ३० वर्षांपासून लोया यांच्याशी मैत्री आहे. लोया कुटुंबीय देखील त्यांना ओळखतात, असे त्यांनी सांगितले. याशिवाय लोया यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रिक्षेने रुग्णालयात नेले, असे मासिकाचे म्हणणे आहे. मात्र, या दाव्यातही तथ्य नाही. लोया यांच्यासोबत असलेल्या एका न्यायाधीशाच्या कारमधूनच लोया यांना रुग्णालयात नेण्यात आले, असे रोहतगी यांनी स्पष्ट केले.

बाँबे लॉयर्स असोसिएशनच्या वतीने बाजू मांडणारे दुष्यंत दवे यांनी सांगितले की, राज्य सरकारने लोया यांच्या मृत्यूनंतर लगेच चौकशी करु नये, याचे आश्चर्यच वाटते. सोहराबुद्दीन चकमक खटला बघणाऱ्या न्यायाधीशाला पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मासिकात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर चार न्यायाधीशांचा जबाब घेण्यात आला, असे त्यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दवे यांच्या दाव्यांवर चिंता व्यक्त केली. दवे यांनी मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. या सर्व प्रकारात काही संशयास्पद आढळले तर तातडीने चौकशीचे आदेश दिले जातील, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले.