News Flash

नक्षलवाद्यांची धमकी तरी जुवी नाल्यावर श्रमदानातून ‘भूमकाल’ पूल बांधणार

नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी जिल्हा, अशी या जिल्ह्य़ाची सर्वत्र ओळख आहे.

जुवी नाल्याच्या पाण्यातून लोक असे सायकल हाती घेऊन नाला पार करतात.

‘आपला विकास आपणच करू’, जिल्ह्य़ातील पहिलाच प्रयोग; नक्षलवाद्यांना गावकऱ्यांचे चोख प्रत्युत्तर

पावसाळ्यात नदीनाल्यावरून पाणी वाहत असल्याने दरवर्षी भामरागड, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटतो, त्यामुळे शिक्षण, रोजीरोटी, आरोग्य, नोकरी, सरकारी कामे यासंबंधीच्या अनेक समस्या निर्माण होतात. दरवर्षीचा हा त्रास लक्षात घेता भूमकाल संघटनेच्या पुढाकाराने श्रमदानातून जुवी नाला बांधकामाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. यासाठी नेलगोंडा व परिसरातील अनेक गावे श्रमदान करणार आहेत. ‘आपला विकास आपणच करू’ या तत्वावर श्रमदानातून पूल बांधण्याचा या जिल्ह्य़ातील हा पहिलाच प्रयोग आहे.

नक्षलग्रस्त अतिदुर्गम आदिवासी जिल्हा, अशी या जिल्ह्य़ाची सर्वत्र ओळख आहे. येथे दरवर्षी पावसाळ्यात नदीनाल्यांना पूर येत असल्याने किमान १५०० हजार गावांचा संपर्क तुटतो, त्यामुळे सारेच प्रश्न निर्माण होतात. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली व अहेरी या चार तालुक्यांमध्ये तर पावसाळा सुरू झाला की, दोन वेळच्या जेवणापासून तर सर्व समस्यांचा सामना आदिवासींना करावा लागतो. कारण, नदीनाल्याच्या पुलावरून ३-४ दिवस आणि कधी कधी तर आठवडाभरही संपर्क तुटलेला राहत असल्यामुळे खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे नदीनाल्यांवर पूल आवश्यकच होता, परंतु नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी जिल्हा प्रशासन या भागात विकासकामे करायला धजावत नाहीत, त्यामुळे हा भाग आजही शेकडो वष्रे मागास आहे. अशा पुलांची मागणी कित्येक वर्षांंपासून सुरू आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. आज नक्षलवांच्या दहशतीनंतरही सूरजागड खाण सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत, परंतु या भागातील पलिांचे बांधकाम व्हावे, यासाठी खासदार अशोक नेते, पालकमंत्री अंबरीश महाराज, आमदारा क्रिष्णा गजबे व आमदार देवराव होळी मुग गिळून बसलेले आहेत. मात्र, भूमकाल या संघटनेला स्थानिक आदिवासींचे दु:ख बघितले गेले नाही. त्यामुळे भूमकालचे प्रा.डॉ.अरविंद सोहनी व प्रा. दत्ता शिर्के यांनी भामरागड परिसराचा दौरा करून सातत्याने बैठका घेऊन जुवी नाला बांधकामाचे कार्य श्रमदानातून हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी यासंदर्भात नेलगोंडा येथे भूमकालचे डॉ.सोहनी व प्रा. शिर्के यांनी स्थानिक आदिवासींची एक महत्वाची बैठक घेतली. यात ‘आपला विकास आपण करू’ या तत्वावर श्रमदानातून पूल बांधण्याचा जिल्ह्य़ातील पहिलाच प्रयोग जुवी नाल्यावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नेलगोंडा भागातील घोटपाडी, नेलगोंडा, जुवी, गोंगवाडा, हितलवाडा, भटपार, कवंडे, कुचेर, परायनार, इरपनार, मर्दा-मालेंगा, मिडदापल्ली, हितलवाडा, दरभा, बोडंगे या गावातील लोक सहभागी झाले होते. या कामात भूमकाल संघटना मदत करणार आहे. सरकारसारखा पक्का आणि महागडा पूल बांधणे आपल्याला शक्य नसल् तरी आपण सगळे मिळून सिमेंट पाईपचा पूल बांधायचा, असे या बैठकीत ठरले. यासाठी आदिवासी बांधव पुढे आल्यामुळे आता शहरी भागातील बांधवही नक्कीच आर्थिक मदत करतील. चला तर, आपण श्रमदान करू आणि नवीन भारत घडवू. ‘आमच्या गावात आमचे सरकार, आमचा पूल आम्हीच बांधणार, चला दादा चला ताई, पुलीया बांधायला करा घाई’, असे आवाहन ‘भूमकाल’च्या वतीने करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेकडो लोक एकत्र येत आहेत. आम्हाला नक्षलवाद्यांची भीती नाही, पहिले विकास हवा, नंतर काय ते बघता येईल, असे गावकरी सांगत आहेत.

जीवाची पर्वा न करता गावकरीच यासाठी पुढाकार घेत असल्याने सर्वामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे आता जुवी पुलाचे बांधकाम होत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही. सप्टेंबरमध्ये हा पूल बांधूच, असा आत्मविश्वास प्रा. सोवनी व प्रा. शिर्के यांनी व्यक्त केला.

.. तर हात कलम करू -नक्षलवाद्यांनी धमकी

यासाठी पुढाकार घेणाऱ्या आणि पहिली विट लावणाऱ्याचे हात कापून फेकण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. भूमकाल संघटनेने पूल बांधण्याचे म्हटले असले तरी ही बाब नक्षलवाद्यांनी अतिशय गांभीर्याने घेतली आहे, त्यामुळे यासाठी जो कुणी समोर येईल त्याचे हात कापून फेकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:32 am

Web Title: juvi river bridge issue between naxalist and civilians in gadchiroli
Next Stories
1 राज्यात पोलीस पाटलांची सोळा हजार पदे रिक्त
2 विधी महाविद्यालयांत आजपासून प्रवेश प्रक्रिया
3 चौपदरीकरणापायी दुरुस्त्या रखडल्या
Just Now!
X