जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात आणि गुलालाची उधळण करीत वाडी-रत्नागिरी येथे दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा सोमवारी अपूर्व उत्साहात पार पडली. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या विधीला फाटा मिळाला आणि शासकीय अधिका-यांना मान मिळाला. यात्रेत महाराष्ट्रसह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमधून सुमारे ५ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते.
गेल्या चार दिवसांपासून जोतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. पहाटे तीन वाजता महाघंटानाद, पहाटे चार ते पाच श्री जोतिबामूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली. पाच ते सहाच्या दरम्यान पारंपरिक पद्धतीने महाभिषेक झाल्यानंतर श्री जोतिबा देवास शासकीय महावस्त्र अर्पण विधी झाला. चत्र यात्रेनिमित्त श्री जोतिबाची राजेशाही थाटातील अलंकारिक पगडी बठी महापूजा बांधण्यात आली होती.
लोकसभा आचारसंहितेचा प्रभाव यात्रेच्या विधीवर दिसून आला. मंत्र्यांची गरउपस्थिती प्रकर्षांने जाणवली. पूजा-अभिषेक हा विधी प्रांत रवींद्र खाडे, तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. तर दुपारी मानाच्या सासन काठीचे पूजन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते झाले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, माजी आमदार शंभूराज देसाई, पोलीस उपाधीक्षक वैशाली माने आदी उपस्थित होते.
प्रथम मानाची असणा-या सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी सासनकाठीचे पूजन झाले. यानंतर मौजे विहे (ता. पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), करवीर, कसबा सांगाव, किवळ, कवठेएकंद, कोल्हापूरचे छत्रपती यांच्या अनुक्रमे सासनकाठय़ा मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यंदा जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात्रेचे शिस्तबद्ध नियोजन केल्याने दर्शन सोयीस्कर झाले. तर वाहतूकही सुरळीत होती.