विश्वास पवार

कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर सुरू झालेला असतानाच दुसरीकडे पर्यटकांना मात्र येथे प्रवेशबंदी आहे. येथील कुंपणं पूर्णपणे बंद करण्यात आली असून, या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

पावसाळा सुरू झाला, की उन्हाने गवताची वैराण झालेल्या कासच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते. जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते. टप्प्याटप्प्याने इथे वेगवेगळी जैवविविधता अवतरून काही ठरावीक काळात निरोप घेऊन नवीन फुलांना संधी देतात. प्रदेशनिष्ठ अशा ‘सातारॅन्सिस’ या फुलाचे आगमन जूनमध्येच होते. ऑगस्टच्या शेवटापर्यंत सर्व प्रकारची फुले थोडय़ा प्रमाणात यायला सुरुवात होते. पावसाची संततधार व धुक्याची दाट चादर कमी झाल्याने, उन्हे वाढल्याने पठार विविधरंगी फुलांनी बहरले आहे.

सद्य:स्थितीत लाल रंगाचा तेरडा, कीटकभक्ष्यी निळी सीतेची आसवे, पांढरे चेंडच्या आकारासारखे गेंद, टूथब्रश, वायतुरा, पिवळी सोनकी, अबोलिमा, चवर (रानहळद), पंद, पांढरी तुतारी, आमरीचे विविध प्रकार आदी फुले पठारावर उमलली आहेत.

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

करोना संसर्गामुळे या वर्षी पठारावरील हंगाम सुरू होण्याची शक्यता नसल्याने कास पठार कार्यकारी समितीकडून कसलेही नियोजन झालेले नाही. तरीही शनिवारी, रविवारी पर्यटकांची पावले पठाराकडे मोठय़ा प्रमाणात वळू लागली आहेत. समितीने कास पठारावर पर्यटकांच्या येण्यावर निर्बंध लादले असून पठारावर प्रवेश करू नये, अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी लावले आहेत. यामुळे पर्यटकांना फुले पाहण्याचा आनंद लुटता येत नाही. पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी पर्वणी असणाऱ्या कास पठारावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्मीळ आणि तितक्याच लक्षवेधी फुलांचा बहर आला आहे.

दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पठार पर्यटकांसाठी खुले केले जाते; पण यंदा मात्र हे चित्र काहीसे वेगळे आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे कास पठाराची परिस्थितीही काही वेगळी नाही. यंदा कास बहरले खरे, पण निसर्गाची ही लीला पाहण्यासाठी पर्यटकांना मात्र या ठिकाणाला भेट देता येणार नाही.

जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद असणाऱ्या या कास पठारावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक आणि पर्यटक भेट देत असतात; पण यंदा मात्र हे पठार कुलूपबंदच असेल.

कास पठारावर दुर्मीळ फुलांचा बहर सुरू झालेला असतानाच दुसरीकडे पर्यटकांना मात्र येथे प्रवेशबंदी आहे. येथील कुंपणे पूर्णपणे बंद करण्यात आली असून, या भागाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. परिणामी येथे कोणाचाही वावर दिसून येत नाही. अतिशय सुरेख अशा कास पठारावर अनेक लहानमोठे धबधबे आणि तलाव आहेत. ज्या भागांमध्ये दुर्मीळ फुलांची दाटी पाहायला मिळत आहे; पण या वर्षी मात्र हा बहर सर्वानाच दुरूनच पाहावा लागणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे.

मागील दोन वर्षांपासून कास पठारावरील ग्रामस्थांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी हवामानातील बदलामुळे पठार फुललेले नव्हते. त्यामुळे पर्यटक येऊ शकले नाहीत आणि या वर्षी पठारावरील जैवसंपदा बहरली आहे; परंतु करोना संसर्गामुळे पर्यटन बंद असल्याने पर्यटकांसाठी पठार बंद आहे. यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक स्रोत बिघडले आहे. त्यांच्यामुळे छोटेमोठे उद्योग असणारे सर्व जण आर्थिक अडचणीत आले आहेत.

– सोमनाथ जाधव, सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

या वर्षी कास पठार फुलले असून सर्वत्र फुलांचा चांगलं बहर आहे. मात्र करोना संसर्गाच्या अनुषंगाने पर्यटनाला परवानगी नसल्याने पठारावरील निसर्गसौंदर्य या वर्षी पर्यटकांसाठी खुले नाही.

– रंजनसिंह परदेशी, वनक्षेत्रपाल, मेढा