कबीर कला मंचाचे सचिन माळी यांना मंगळवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या चार वर्षापासून सचिन माळी तुरुंगात असून नक्षली कारवायांशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

पुण्यात सक्रीय असलेल्या कबीर कला मंचचे काही तरुण नक्षलवादी चळवळीत सक्रीय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सचिन माळी, शीतल साठे व अन्य काही तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून फरार असलेल्या या तरुणांनी एप्रिल २०१३ ला मंत्रालयासमोर आंदोलन करून स्वत:ला अटक करून घेतली होती. यापैकी शीतल साठेची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. तर सचिन माळी गेल्या चार वर्षापासून तुरुंगातच होते.

सचिन माळी आणि शीतल साठे यांच्या अटकेवरुन राज्यात गदारोळ झाला होता. तर पोलिसांनी मात्र सचिन माळी आणि अन्य तरुणांविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा केला होता. या सर्वांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सचिन माळीसह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांनी जामिनावर सुटका केली.

कबीर कला मंचाची वादग्रस्त वाटचाल
कबीर कला मंचचा संस्थापक अमरनाथ चंड्डालिया याला दोन वर्षांपूर्वी अटक झाली होती, तेव्हा त्याने दहशतवाद विरोधी पथकासमोर मंचची कार्यपद्धती उघड केली होती. सन २००२ मध्ये चंड्डालिया याने कबीर कला मंचची स्थापना केली. तो २००८ पर्यंत कबीर कला मंचचा सदस्य होता. २००५ मध्ये शीतल साठे, सचिन माळी, रमेश गायचोर, दीपक ढेगळे, सागर गोरखे यांनी कबीर कला मंचमध्ये प्रवेश केला. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २०११ मध्ये पुणे ठाणे येथून काही तरुण-तरुणींना अटक केली होती. त्याच वेळी नक्षलवादी अँजेलो हिला अटक केली.