शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उस्मानाबाद शहरात सलग २१ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मागील २१ दिवसांपासून प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी चक्क अंगावर कफन ओढून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत सीएएच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या कफन ओढो आंदोलनात उस्मानाबाद शहर आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. जोवर एनआरसी रद्द होत नाही, तोपर्यंत अशा पध्दतीचे आंदोलन सुरुच राहील, असा संकल्पही यावेळी आंदोलकांनी केला.

या आंदोलनास आजवर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, भारीप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, अवेरनेस ग्रुप, व्हीजेएनटी कृती समिती, युनिटी फौंडेशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, काँग्रेस (आय), राष्ट्रीय मानवाधिकार संघ, फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समिती, एमआयएम, बेघर्स फ्री इंडिया, बहुजन समाज पार्टी, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इमाम कौन्सिल अशा विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच उपोषणस्थळी विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक, सर्वसामान्य नागरिक अशा पाचशेहून अधिक जणांनी प्रत्यक्ष भेट देऊन या आंदोलनाला समर्थन दिले आहे.