युवक काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी खूनप्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष भरारी पथकाकडून शनिवारी (दि. २८) आरोपपत्र दाखल होणार आहे. दरम्यान, कल्पनाचे वडील मंगल गिरी यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अर्ज पाठवून साकडे घातले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान हे खूनप्रकरण घडल्यानंतर लातुरात प्रचारास आलेल्या मोदी यांनीच हे प्रकरण देशभर चच्रेत आणले. प्रचारसभेनंतर मोदी यांनी लातुरात गिरी कुटुंबीयांची भेटही घेतली होती.
लातूर शहर विधानसभा सचिव असलेल्या कल्पना गिरी २१ मार्चला रंगपंचमीच्या दिवशी सकाळी घराबाहेर पडल्या, त्या रात्री परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या भावाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. दोन दिवसांनी, २३ मार्चला तुळजापूर शिवारातील पाचुंदा तलावात कल्पनाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तुळजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. कल्पनाचे वडील मंगल गिरी यांनी आपल्या मुलीवर लंगिक अत्याचार करून खून झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी युवक काँग्रेसचा लातूर शहर विधानसभा अध्यक्ष महेंद्र विक्रमसिंह चौहान व त्याचा मित्र समीर नूरमियाँ किल्लारीकर यांना ताब्यात घेतले. कल्पनास घेऊन जाण्यासाठी वापरलेली गाडी सापडली. लातूर-तुळजापूर रस्त्यावरील टोलनाक्यावर सीसी टीव्ही फुटेजमध्ये गाडीत तिघेजण असल्याचे दिसून आले.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सुमारे दीड महिना या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणी सीबीआय तपास व्हावा, ही मागणी जोर धरू लागली होती. मात्र, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्यात आला. या विभागाचे येथील पोलीस उपअधीक्षक बी. एम. हिरमुखे यांनी २० दिवस तपासाची सूत्रे हलवली. नंतर पुणे येथील विशेष भरारी पथकाकडे तपास सोपवण्यात आला.
२९ मार्च रोजी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर ९० दिवसांत न्यायालयात आरोपपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार आरोपपत्र तयार करण्याच्या कामाने वेग घेतला. पोलिसांनी या प्रकरणात महेंद्रसिंह चौहानचे वडील माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान व नगरसेवक कुलदीप ठाकूर यांच्यावरही आरोप ठेवला. प्रारंभी हे दोघे पोलिसांना सापडत नव्हते. दोघांनीही अटकपूर्व जामीन मिळावा, या साठी प्रयत्न केला. मागील आठवडय़ात विक्रमसिंह चौहान यांनी जामिनासाठीचा केलेला अर्ज मागे घेतला, तर कुलदीप ठाकूर यांच्या अर्जावर सुनावणी बाकी आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे खून प्रकरण चांगलेच गाजले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेचा विषय घेऊन हे प्रकरण देशभर चच्रेत आणले. गिरी कुटुंबीयांची मोदींनी लातुरात भेटही घेतली. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, या साठी कल्पनाचे वडील माजी सनिक मंगल गिरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडेही अर्ज केला आहे. मुख्यमंत्री निधीतून गिरी कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत देऊ करण्यात आली. मात्र, खुनाचा तपास योग्य रीतीने व्हावा व दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच मदत द्या, असे सांगत गिरी कुटुंबाने ही मदत नाकारली.
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे हा खटला चालवण्यास द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेकांनी केली. मात्र, यासंबंधी अजून निर्णय झाला नाही. या प्रकरणातील उर्वरित दोन संशयित आरोपी विक्रमसिंह चौहान व कुलदीप ठाकूर यांना अटक कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.