‘काळूबाईच्या नावानं चांगभलं ’च्या जयघोषात मांढरदेव यथील काळेश्वरी देवीची यात्रा संपन्न झाली. शाकंभरी व पौष पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मांढरदेव येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मंगळवारी देवीची उत्तर यात्रा भरणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केल्याचे दिसून आले.

सोमवारी पहाटे काळेश्वरी देवीची मांढरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा करण्यात आली. पहाटे सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत व देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा जिल्हा न्यायाधीश वर्षा पारगावकर तसेच प्रशासकीय विश्‍वस्त तथा प्रांताधिकारी संगीता राजापुरकर-चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, प्रशासकीय विश्‍वस्त तथा तहसीलदार रमेश शेंडगे, विश्‍वस्त अ‍ॅड. मिलिंद ओक, अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री काळेश्‍वरी देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी नगर जिल्ह्यातील भाविकाला देवीच्या पूजेचा मान मिळाला. त्यानंतर दिवसभर देवीचे दर्शन भाविकांना उपलब्ध झाले.

यावर्षी पौर्णिमा दोन दिवस आली. पहिल्या दिवशी रविवार असल्याने अनेक चाकरमानी, नोकरदार आणि सर्वसामान्यांनी रविवारीच गडावर गर्दी केली होती. शाकंबरी पौर्णिमा व यात्रेचा मुख्य दिवस असल्याने रात्री देवीचा जागर झाला. यानंतर देवीचा वाजतगाजत छबिना निघाला. ग्राम प्रदक्षिणा करून पहाटे पालखी मंदिराच्या पारावर आली. भाविकांची दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. पहाटे साडेपाचला देवीची महापूजा बांधण्यात आली. मागील दोन दिवसांपासून मांढर गडावर यात्रेनिमित्त भाविकांचा ओघ सुरू आहे. यात्रेच्या नियोजन व व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस विभाग, विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी आहे. पोलीस, राज्य राखीव दल, होमगार्ड, स्वयंसेवक भाविकांना सुलभ दर्शन उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. भाविकांसाठी मुखदर्शन, कळस, देव्हारे दर्शन आदींसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली आहे. प्रशस्त वाहन तळ, यात्रेवर सीसीटीव्हीची बारीक नजर आहे. पोलीस, महसूल आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.