राज्यात एकीकडे करोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झालेली जात असताना, दुसरीकडे आहेत त्या कोविड सेंटर्समधील व्यवस्था व शिस्तीकडे लक्ष देण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण, कोविड सेंटरमधून वस्तू गहाळ होणे, रूग्ण पळून जाणे, महिलांचा विनयभंग आदी घटना घडलेल्या असताना आता कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुल मधील कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन धिंगाणा घातला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर कल्याण – डोंबिवली महापालिकेकडून ट्विटद्वारे खुलासा करण्यात आला आहे.

कल्याण- डोंबिवली महापालिकेन म्हटले आहे की, व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कळविण्यात येते की सदर कर्मचारी हे संबंधित ठिकाणी मनुष्यबळ पुरवणे व व्यवस्थापन करणेकामी नेमण्यात आलेल्या संस्थेचे कर्मचारी होते. त्यांचा महापालिकेशी थेट संबंध नाही.

तसेच, सदर कर्मचाऱ्यांची ड्युटी संपली होती आणि सदर प्रकार रुग्णालयात घडलेला नसून रुग्णालयाच्या मागच्या बाजूला झालेला आहे. सदर गोंधळ घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थेने तत्काळ निलंबित केले आहे.

याप्रकरणी संबंधित संस्थेला समज देण्यात आलेली असून यापुढे असे अनुचित प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेणे बाबत संस्थेस सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.