मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे ‘जेसीबी’च्या सहाय्याने  शिवरायांचा पुतळा तोडण्याचा प्रकार हा अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह असून याबद्दल मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवप्रेमींना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा शिवरायांचे तेरावे वंशज व माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा शहरात असलेला शिवरायांचा पुतळा स्थानिक प्रशासनाने रातोरात ‘जेसीबी’ आणि बुलडोझर चालवून उद्ध्वस्त केला. या घटनेचे चित्रीकरण ‘समाज माध्यमां’वर सर्वत्र फिरू लागल्यावर

मध्यप्रदेश सरकार आणि काँग्रेस पक्षाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही निषेध होत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी या संतापजनक प्रकाराबद्दल चीड व्यक्त करत कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने जाहीर माफीची मागणी केली आहे.

उदयनराजे म्हणाले, की काँग्रेस किंवा त्यांच्या समविचारींच्या राज्यात राष्ट्रपुरुषांचा मुद्दाम अपमान करत त्यांचे कार्य पुसण्याचे वा त्याला धक्का लावण्याचे काम  सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर आता शिवरायांचादेखील या राज्यांमधून असाच अवमान केला जात आहे. या  राष्ट्रपुरुषांनी निर्माण केलेला धगधगत्या क्रांतीचा इतिहास या पक्षांना पुसून टाकायचा आहे. परंतु हा प्रकार जनता सहन करणार नाही. अशा प्रकारे इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरुद्ध जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

महाराजांच्या पुतळय़ावर बुलडोझर घालण्याची या पक्षाची हिम्मत होतेच कशी असा प्रश्न करत उदयनराजे म्हणाले, की याबद्दल कमलनाथ आणि काँग्रेस पक्षाने लवकरात लवकर जाहीर माफी न मागितल्यास शिवप्रेमींना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल.

दरम्यान मध्यप्रदेशमधील हजारो शिवभक्तांनी स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी तिथे पुन्हा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. त्याबद्दल सर्व मावळ्यांचेही उदयनराजे यांनी आभार मानले आहेत.