वसई पूर्वेतील कामण येथे पालिकेचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालय अनेक वर्षे जुने असल्याने सध्या या कार्यालयाचे बांधकाम हळूहळू निखळून खाली पडत आहे. तर भिंतींनाही तडे गेल्याने हे कार्यलय धोकादायक स्थितीत आहे. कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामपंचायत काळापासून अस्तित्वात असलेल्या कार्यालयातच पालिकेचे विभागीय कार्यालय सुरू आहे. येथे पाणीपट्टी, मालमत्ता कर, पोलिओ मोहीम आणि इतर कामासाठी नागरिक येत असतात. परंतु या कार्यालयाच्या देखभालीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने या कार्यलयाची बिकट अवस्था झाली आहे. कार्यलयाच्या भिंतींना तडे गेले आहेत. तर काही ठिकाणी स्लॅब कोसळून खाली पडून त्यातील लोखंडी सळया सुद्धा बाहेर दिसू लागल्या आहेत. अशा धोकादायक परिस्थितीत  येथे पालिकेचे कर्मचारी काम करतात. व इतर नागरिकही येथे ये-जा करीत आहेत.

आधीच राज्यात विविध ठिकाणी इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहे.त्याच अनुषंगाने हे कार्यलय देखील अनेक वर्षे जुने कार्यलय आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे कार्यलय कोसळून दुर्घटना होण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले.

या कार्यालयाची दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील दोन वर्षांंपूर्वी सुद्धा पालिकेशी पत्रव्यवहार केला होता परंतु त्यावर पालिकेने कोणतीच उपाययोजना न केल्याने आज ही  कार्यलयाची इमारत अधिक धोकादायक झाली असल्याचे माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी सांगितले आहे. पालिकेने इतर कोणत्या दुर्घटना घडण्याची वाट न बघता आता तरी या इमारतीचे नूतनीकरण करावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.