टाळेबंदीत सरकार अन्न धान्य देत नसल्याचे सांगत  मूळ गावी जाण्यासाठी परप्रांतीय मजूरांना घरी जाण्याची सोय करावी असे विधान करत परप्रांतीय मजुरांमध्ये अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व  समाजमाध्यमांवर अफवा पसरविणाऱ्या दोघांना कामोठे पोलीसांनी अटक केली आहे.

पनवेलच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कामोठे पोलिसांनी कमलेश दुबे याला कामोठे येथून अटक केली आहे. मंगळवारी वांद्रे स्थानकासमोर झालेल्या गर्दीप्रकरणी समाजमाध्यमांवर विविध लघुसंदेशाने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्यामुळे नवी मुंबईच्या विनय दुबे याला अटक केल्यानंतर बुधवारी पनवेलमध्ये पोलीस, महसूल विभाग व पालिका अधिकरी यांच्यात झालेल्या बैठकीत पनवेलमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्याच बैठकीत अनेक तलाठ्यांनी समाजमाध्यमांवर कामोठे येथील स्वयंघोषित समाजसेवक कमलेश दुबे व मोहम्मद साजिद शकील अन्सारी या दोघांचे लघुसंदेश उघड केल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षक बाबासाहेब तुपे यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलिसांनी चित्रफीत बनविणाऱ्यांकडे धान्य मिळत नसल्याने व कुठून आणि कधी आले याबद्दल चौकशी केल्यावर संबंधित व्यक्तीने सरकारी धान्य पुरवठा योजनेचा लाभ घेतला असून स्वयंसेवी संस्थेमार्फत वाटपाचा लाभार्थी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.