अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यातील वादावर अजूनही शमला नसल्याचंच दिसून येत आहे. कंगना रणौतनं आणखी एक ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “मुव्ही माफिया आणि सुशांतची हत्या करणाऱ्या उघड पाडलं (एक्सपोज केलं) हाच माझा गुन्हा आहे,” असं म्हणत कंगनानं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कंगना रणौतनं ९ सप्टेंबर रोजी मुंबईत आली होती. त्यामुळे शिवसेना आणि तिच्यातील वाद जोरात उसळून आला होता. त्यानंतर आज (१४ सप्टेंबर) कंगना मुंबई सोडून मनालीतील आपल्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग्ज रॅकेट यांचा पर्दाफाश केला. ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो. हाच माझा मोठा गुन्हा आहे, त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहत आहेत. पण, बघू कोण कुणाला फिक्स करत ते,” असा इशाराही कंगनानं उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

वादग्रस्त ट्विट ते बीएमसीची कारवाई

राम कदम यांच्या सुरक्षा पुरवण्याच्या ट्विटवर बोलताना कंगनानं एक ट्विट केलं होतं. “सर…माझ्या काळजीसाठी धन्यवाद, पण खरंतर मला आता मुव्ही माफिया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटतेय…त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…”अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली. राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. हा सगळा वाद पेटत गेला. त्यात मुंबई महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कंगनाच्या कार्यालयावर हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका केली होती.