बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती आणण्यात आली आहे. मात्र महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंबंधी वृत्त दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारची कारवाई करुन आपण शंका निर्माण होण्यास संधी देत आहोत अशी टीका केली. तर दुसरीकडे शिवसेना आणि कंगनाचं नाव न घेता वक्तव्यांना उगाच महत्त्व दिलं जात असल्याचंही ते म्हणाले.

अभिनेत्री कंगना रणौतने सुशांत सिंह प्रकरणावरुन तपास करताना मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केली होती. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबई सोडून जाण्याचा सल्ला दिला. कंगनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होऊ लागल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली. या सर्व घडामोडी सुरु असतानाच कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.

“शंका निर्माण होण्याची संधी…”, कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांनी केलं भाष्य

आधीच सुशांत सिंह प्रकरण हाताळण्यावरुन राज्य सरकारला टीकेला सामोरं जावं लागत असताना कंगना प्रकरणामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याचं कळत आहे. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. यावेळी मुख्यत्वे मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. मात्र यावेळी शरद पवारांसोबत काँग्रेस नेतेही नाराज असल्याचं चित्र होतं.

ठाकरे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, “कंगनाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. उगाच तिला महत्व दिलं जात आहे”. दुसऱ्या एका नेत्याने हा ‘सेल्फ गोल’ असल्याची टीका केली.

कंगनाच्या PoK वक्तव्यावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनीही नाराजी व्यक्त करत टीका केली. “सत्तेत असताना तुम्ही अशा गोष्टी करु शकत नाही. तुम्ही अत्यंत चुकीचा संदेश पाठवत आहात. कंगना कदाचित भाजपाच्या संपर्कात असेल, भाजपाच्या सांगण्यावरुन ती हे सर्व करत असेल, पण मग तुम्ही त्यांच्या जाळ्यात का अडकत आहात ? मी शांत बसू शकत नाही. हे खूप वाईट दिसतं,” असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मिलिंद देवरा यांनीही सर्व पक्षांनी एकत्र येऊन आपली प्राथमिकता ठरवली पाहिजे असं ट्विट करत प्रशासनाऐवजी राजकीय गोष्टींकडे लक्ष देण्यावरुन नाराजी व्यक्त केली.

शरद पवारांनी थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेने कंगना रणौत प्रकरण हाताळताना नेतृत्त्वाला धक्का दिला असल्याचं सूचक होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे परभणी येथील खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादीसोबत असलेल्या वादानंतर खासदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिली होती. तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर बोलताना मुख्यमंत्र्यांची इच्छा नसतानाही लॉकडाउन उठवला असा गौप्यस्फोट केला होता. अप्रत्यक्षपणे त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता.