कन्हैयाकुमार यांची भाजप आणि रा. स्व. संघावर टीका

औरंगाबाद : विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून राममंदिराचा मुद्दा पुढे करणाऱ्यांच्या आस्था रामभक्तीच्या नाहीत, तर ते नथुरामभक्त आहेत, असे सांगत कन्हैयाकुमार याने रा. स्व. संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. संविधान बचाओ- देश बचाओ या शीर्षांखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी पुढाकार घेतलेल्या सभेत ते बोलत होते.

देशभर कृषीशी संबंधित वेगवेगळे समुदाय आरक्षण मागू लागले आहेत. ही परिस्थिती जन्माला येण्यामागे शेतीतील तोटा हे मुख्य कारण आहे. महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पाटीदार, जाट, गुर्जर हा बहुसंख्य समाज कृषीशी संबंधित आहे. त्यांच्यातील असंतोष वाढतो आहे. हा असंतोष २०१४ पूर्वीपासूनचा आहे. पण त्याच्यावर कोणीच उपाययोजना करत नाही.

या सरकारच्या काळात तर ती केली गेली नाही. परिणाम सर्वत्र दिसू लागले आहेत. सर्वसामान्य कष्टकरी, मजूर वर्गाविषयी मोदी सरकारला सहानुभूती वाटत नाही.

अनुष्का शर्माच्या आणि ट्रम्पच्या मुलीच्या विवाहाला जाण्यासाठी पंतप्रधानाला वेळ मिळतो, मग गटार साफ करणाऱ्या कामगारांच्या घरी किंवा आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांना ते भेटायला येत नाही. कारण विकास हा मुद्दा राहिला नाही. राममंदिराचा प्रश्न हा या पाश्र्वभूमीवर पुढे आणला जात आहे.

भाजपला किंवा रा. स्व. संघाला रामभक्तीशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या आस्था नथुरामाशी आहे, अशी टीका कन्हैयाकुमार याने केली. या सभेस राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण, बाबाजानी दुर्राणी यांच्यासह कॉ. तुकाराम भस्मे, राम बाहेती, अशफाक सलामी प्रा. सुनील मगरे, इलियास किरमाणी यांच्यासह डाव्या चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भयग्रस्त वातावरणात घटना वाचविण्यासाठी सर्व मतभेद बाजूला करून अधिक संघटितपणे एकत्रित यायला हवे, असे आवाहन कन्हैयाकुमार याने या वेळी केले.