उपअभियंत्यांवर चिखलफेकीचा प्रकार आमदार नितेश राणे यांना भोवला आहे. नितेश राणे यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 4 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. दरम्यान, ही मुदत संपल्यानंतर त्यांना आज (मंगळवारी) दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गुरूवारी सकाळी नितेश राणे आणि स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता. त्यानंतर गडनदीवरील पुलावर शेडेकर यांना बांधून ठेवण्यात आले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया नितेश राणे यांचे वडिल नारायण राणे यांनी माफी मागितली होती. तसेच नितेश राणेंच्या समर्थकांकडून करण्यात आलेल्या कृतीचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगत त्यांना आपण पाठिंबा देणार नसल्याचे म्हटले होते.

या घटनेनंतर महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाकडून नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांच्या कृतीचे निषेध करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेडेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सरकार त्यांच्या पाठिशी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला होता. सरकार अधिकाऱ्यांच्या पाठीशी असून प्रकाश शेडेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पाटील यांनी म्हटले होते.