News Flash

कणकवलीच्या छायाचित्रकाराचे जगभरात कौतुक

‘अ‍ॅपल’कडून होळीनिमित्त खास मालिका सादर

छायाचित्रकार इंद्रजित खांबे

चिन्मय पाटणकर, पुणे

जगाच्या एका कोपऱ्यातील माणसाला इंटरनेटमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही संधी कशी मिळू शकते, याचे कणकवलीचा प्रयोगशील छायाचित्रकार इंद्रजित खांबे समर्पक उदाहरण ठरला आहे. इंद्रजितच्या छायाचित्रांवर जगप्रसिद्ध कंपनी ‘अ‍ॅपल’ची मोहोर उमटली असून, या निमित्ताने त्याचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

‘फोटो डॉक्युमेंट्री’ या प्रकारात इंद्रजित छायाचित्रे काढतो. कोकणातल्या कणकवलीत राहणारा इंद्रजित त्याचे फोटो समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करतो. त्याने कुस्ती, दशावतार अशा विविध विषयांवर छायाचित्र मालिका केल्या आहेत. इंद्रजितचे काम पाहून अ‍ॅपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने फेब्रुवारीत ई मेलद्वारे इंद्रजितशी संपर्क साधून त्यांच्यासाठी काम करण्याबद्दल विचारणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कंपनीकडून त्यांच्यासाठी काम करण्याची चालून आलेली संधी इंद्रजितने स्वीकारली. त्याबाबत अ‍ॅपलकडून इंद्रजितसह रीतसर करारही करण्यात आला. त्यानंतर राजस्थानमधील उदयपूर येथे त्याला छायाचित्रे काढण्यासाठी नेण्यात आले. होळीच्या निमित्ताने रंग निर्मितीच्या प्रक्रियेवर आधारित छायाचित्रे इंद्रजितने काढली. होळीच्या मुहूर्तावर २० मार्चला ही आठ छायाचित्रांची मालिका ‘अ‍ॅपल’ने समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्ध केली. ही संधी मिळालेला इंद्रजित हा एकमेव भारतीय छायाचित्रकार ठरला आहे.

अ‍ॅपलकडून मिळालेल्या या संधीविषयी इंद्रजितने ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘अ‍ॅपलकडून काम करण्याबाबत विचारणा झाल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. एवढय़ा मोठय़ा ब्रँडसाठी काम करण्याची ही संधी फारच मोठी होती. छायाचित्रांच्या मालिकेसाठी त्यांनी होळी हा विषय दिला होता. पण होळी या विषयातील छायाचित्रांमध्ये अलीकडे तोचतोचपणा आला आहे. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात रंग कसे आले हा विचार घेऊन ही छायाचित्रे काढायचे ठरवले. त्यासाठी अ‍ॅपलकडून पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. आयफोनवरच ही छायाचित्रे काढण्यात आली. छायाचित्र मालिकेसाठी रंग तयार करणाऱ्या राजस्थानातील महिलांसह काम करण्याचा हा अनुभव फारच उत्तम होता. आत्ताचा काळ हा विकेंद्रीकरणाचा आहे. कुठेही ग्रामीण भागात राहणारा माणूस इंटरनेटचा वापर करून, ध्यास घेऊन काम केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतो,’ असे इंद्रजितने सांगितले.

अशी झाली निवड..

मोबाइलवर काढलेल्या छायाचित्रांच्या स्पर्धेत इंद्रजितला पहिला क्रमांक मिळाला. त्यात पारितोषिक म्हणून त्याला आयफोन मिळाला. त्यानंतर तो आयफोनवर छायाचित्रे काढून समाजमाध्यमांत पोस्ट करू लागला. त्याने आयफोनवर काढलेली छायाचित्रे ‘अ‍ॅपल’च्या अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांत पाहून त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला हे काम करण्याची संधी मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 11:56 pm

Web Title: kankavli photographer indrajit khambe get worldwide appreciation
Next Stories
1 धवलसिंह मोहितेंची शिवसेनेतून हकालपट्टी, शरद पवारांची घेतली होती भेट
2 ‘पार्थ’सुद्धा ‘मावळ’णार, भाजपाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर व्यंगचित्रातून निशाणा
3 मुख्यमंत्र्यांनी घोटली सत्तेची ठंडाई, शिवसेनेला युतीची नशा-राष्ट्रवादी काँग्रेस
Just Now!
X